आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेची पुनर्बांधणी: 'स्काइप'वरून राज ठाकरे राहणार कार्यकर्त्यांशी कनेक्टेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कार्यकर्त्यांशी नियमित संवादावर सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भर दिला अाहे. गेले काही दिवस त्यांनी स्काइपच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी दूरस्थ संवाद सुरू केला आहे.

गेले आठ ते दहा दिवस त्यांनी ‘कृष्णकुंज’मधील कार्यालयातून या तंत्राच्या साहाय्याने विविध ठिकाणच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नाशिक, कल्याण, डाेंबिवली, मुंबई आणि ठाणे या प्रमुख महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध भागांतल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सहज संवाद साधण्यासाठी त्यांनी ही हायटेक यंत्रणा विकसित केली आहे.

लोकसभा आणि विधानसभेतल्या लागोपाठच्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या पुनर्बांधणीचे संकेत दिले होते. तसेच यापुढे राज्यभरात दौरे आखून विविध भागांतील कार्यकर्त्यांशी नियमित संवाद साधण्याचे वचनही दिले होते. मात्र, मुलगी उर्वशी हिला झालेला अपघात असो किंवा ऐनवेळी उद्‍भवत असलेल्या इतर अडचणींमुळे त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले होते. यावर उपाय म्हणून आता मनसेच्या आयटी विभागाने ‘स्काइप’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक संवाद यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानी असलेल्या कार्यालयातून राज ठाकरेंना राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सोपे होणार आहे.

दाेन अायटी तज्ज्ञांवर धुरा
सौरभ करंदीकर आणि केतन जोशी या आयटी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही यंत्रणा उभारली. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील मनसेची मध्यवर्ती कार्यालये या यंत्रणेच्या माध्यमातून जोडली जाणार असल्याचेही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. या तंत्रज्ञानामुळे फारच कमी कालावधीत राज ठाकरेंना राज्याच्या विविध भागांतल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी झटपट संवाद साधणे शक्य होणार असून पक्षाची आंदोलने, कार्यक्रम याविषयी माहिती देणे सुलभ होणार आहे.
संवाद वाढणार
गेले आठवडाभर या यंत्रणेचे परीक्षण सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून राज यांनी मुंबईतील वांद्रे भागातील माणिक लोटलीकर विद्यालयात जमलेल्या मनविसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय मुंबई विद्यापीठात कार्यरत असलेल्या मनसेच्या विद्यार्थी सेनेतील सिनेट सदस्यांशीही आठवड्याभरात तब्बल सहा वेळा संवाद साधून राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत काही सूचना दिल्याची माहिती मनविसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने "दिव्य मराठी'शी बाेलताना दिली.