आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Hits Back At Rajnath Singh Over Remarks On MNS Support To Narendra Modi

बदलली रणनीती : तिसर्‍या टप्प्यात मनसे बदलणार प्रचाराची दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात काहीसे निष्प्रभ ठरलेल्या राज ठाकरे यांनी तिसर्‍या टप्प्यात मात्र आपल्या प्रचाराची रणनीती बदलण्याचे ठरवले आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मनसेला ‘भाजपा विलीन’ होण्याचा दिलेला अनाहूत सल्ला मनसेला चांगलाच झोंबला आहे. म्हणूनच तिसर्‍या टप्प्यात ठाकरेंना मोदींच्या पाठिंब्याबाबतची आपली भूमिका कायम ठेवत राजनाथसिंह यांच्या वक्तव्याचाही समाचार घेण्याची कसरत करावी लागणार आहे.

‘मोदींना पाठिंबा दिला असताना तुम्ही का बोलत आहात,’ अशा शब्दांत राज यांनी पुण्यातील प्रचार सभेत राजनाथसिंह यांना उत्तर देत पुढील प्रचाराची दिशा स्पष्ट केली. राजनाथ यांनी पुण्यातच मनसेला विलीनीकरणाचा सल्ला दिला होता. त्यामुळे पुण्यात जाऊनच राज यांनी हिशेब चुकता केला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीसमोर आपले उमेदवार उभे करूनही पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याची चमत्कारिक भूमिका घेतली. आपल्या प्रचारादरम्यानही राज ठाकरे जाहीरपणे मोदींच्या नेतृत्वगुणाविषयी भरभरून बोलत होते. मात्र अचानक राजनाथसिंह यांनी ‘मनसेने बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा महायुतीत सामील व्हा किंवा भाजपमध्ये विलीन व्हा,’ असा सल्ला दिला. राजनाथसिंह यांच्या या सल्ल्यामुळे मनसेची चांगलीच गोची झाली आहे. विशेषत: ‘भाजपत विलीन व्हा’ हे वाक्य राज ठाकरेंना जास्तच झोंबले असल्याचे कळते. या प्रकारामुळे कार्यकर्तेही प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यात आपल्या प्रचाराची दिशा बदलत काही नव्या मुद्दय़ांसह राज ठाकरे आपल्या भाषणांचा सूर बदलतील, अशी माहिती पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

राजनाथ यांच्या अनाहूत सल्ल्यानंतर मनसेने गेल्या चार दिवसातील सभेत मोदींचा उल्लेखही करण्याचे टाळले आहे. पण तिसर्‍या टप्प्यात कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी सिंह यांना सडेतोड उत्तर देण्याची गरजही मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात व्यक्त होत होती.

‘मराठीचे कैवारी’ राज ठाकरेंच्या हिंदी वाहिन्यांना मुलाखती
मुंबई 2 शिवसेनेत असल्यापासून परप्रांतीयांविरुद्ध मोहीम छेडणारे आणि ‘मराठी’चाच जयघोष करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणारे राज ठाकरे यांचे ‘मराठी प्रेम’ घटत असल्याचे दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत मराठी वाहिन्या आणि वर्तमानपत्रांना मुलाखती देण्याऐवजी ते फक्त हिंदी वाहिन्यांनाच मुलाखती देत असल्याचे दिसून येत आहे. ‘आज तक’वाहिनीला मुलाखत दिल्यानंतर मंगळवारी राज ठाकरे रजत शर्मा यांच्या ‘आपकी अदालत’मध्ये भाग घेणार आहेत. पत्रकार परिषदांमध्ये राज ठाकरे नेहमीच मराठीत बोलतात. मात्र, आता त्यांच्या हिंदी प्रेमाबद्दल भुवया उंचावल्या जात आहेत.