मुंबई - कालपर्यंत राजकीय पटलावर कुठेच नसलेली मनसे महायुती आणि आघाडीतल्या फुटीमुळे अचानक स्पर्धेमध्ये आली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मनसेची अवस्था होईल, असे बोलले जात होते. मात्र, आता बदलत्या राजकीय घडामोडींचा फायदा उचलण्याची रणनीती राज ठाकरे यांनी आखली आहे. त्यातच मराठी अस्मिता बाजूला सारून ब्ल्यू प्रिंट आणि विकासाचे मुद्दे पुढे आणले आहेत.
लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्यानंतर बॅकफूटवर पडलेली मनसे दोन दिवसांतील हालचालींनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरला आहे. त्यात मनसेनेही उडी घेतली आहे. पक्षाची बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट नुकतीच प्रकाशित करण्यात आली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या ब्ल्यू प्रिंटमध्येही शहरी भागांनाच झुकते माप दिले गेले आहे. प्रचारासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने मोजक्याच मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी काँग्रेस आघाडीबरोबरच शिवसेनेलाही लक्ष्य केले होते. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आक्रमक प्रचार करूनही यश पदरात पाडून घेतले होते. मात्र, त्यानंतर विकासाच्या दृष्टीने मनसेला फारसे काहीच करता आले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा मतदारांच्या मनात विश्वास जागवावा लागेल. हे लक्षात घेऊन मनसेने शिवसेना आणि मराठी अस्मितेऐवजी ब्ल्यू प्रिंट आणि विकासावर प्रचाराची रणनीती तयार केली आहे.
कुणाशी मैत्री नाही
महायुती तुटल्यामुळे मनसेसाठी भाजपबरोबर घरोबा करण्याचा पर्याय खुला झाल्याचे बोलले जाते आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी कुणाशीच मैत्री करायची नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली आहे. सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने राज
ठाकरेही
आपली ताकद आजमावून पाहत आहेत, असे बोलले जाते.