आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray May Contest Two Seats In Assembly Election

जनाधारासाठी राज ठाकरेंचा दोन दगडांवर पाय, नांदगावकर निवडणूक लढणार नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: राज ठाकरे)
मुंबई- आगामी काही दिवसात राज ठाकरे महाराष्ट्राची बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट सादर करणार आहेत. याचबरोबर संपूर्ण राज्यभर मनसेला व्यापक जनाधार मिळावा यासाठी राज ठाकरे हे मुंबईसह मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे कळते आहे. मनसेचे नेते व आमदार बाळा नांदगावकर यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद दिले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बाळा नांदगावकर विधानसभेची निवडणूक लढविणार नाहीत, असे सूत्रांकडून कळते आहे.
राज ठाकरेंना अभिप्रेत असणा-या महाराष्ट्र राज्याची ब्ल्यू प्रिंट येत्या 15 ऑगस्टनंतर जाहीर करण्याची शक्यता आहे. सध्या या ब्ल्यू प्रिंटवर शेवटचा हात फिरवला जात आहे. तसेच या ब्ल्यू प्रिंटबाबत सोशल मिडियातून मनसे कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना, सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यात वाढीसाठी पोषक वातावरण, रोजगार, शिक्षण, सिंचन, आरोग्य, शहराची वाढ व तेथील बांधकामाबाबत कसे नियोजन असावे या प्रमुख मुद्यांचा समावेश असल्याचे कळते.

मोदी लाटेमुळे व शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्याने राज ठाकरेंच्या मनसेचे लोकसभा निवडणुकीत पानीपत झाले होते. त्यामुळे गेल्या आठ-दहा वर्षात सर्वात वेगाने वाढलेल्या मनसेचा जनाधार कायम राहावा, कार्यकर्ते व युवकांत राज यांच्यामुळे चैतन्य यावे यासाठी राज ठाकरेंना मुंबईतून व मराठवाड्यातून निवडणुकीला उतरवायचे मनसेने नियोजन केले आहे. मोदींनी जसा व्यक्तिकेंद्रित प्रचार केला तसाच राज ठाकरेंच्या नावाचा प्रचार करण्याचा विचार मनसेत जोर धरत आहे.
या प्रचार यंत्रणेची जबाबदारी आमदार बाळा नांदगावकर यांच्याकडे सोपविण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे ते यंदा निवडणूक लढविण्याची शक्यता कमी आहे. राज जर दोन्ही जागांवर लढले आणि जिंकले तर मुंबईतील जागेचा राजीनामा देऊन नांदगावकर यांना विधानसभेत पाठविले जाऊ शकते. राज यांना मराठवाड्यात मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे ते मराठवाड्यातील आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतील. विधानसभेसाठी किमान 200 जागा लढविण्याचा राज ठाकरेंचा विचार आहे. यासाठी मनसे आमदारांनी राज्यभर दौरा करुन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला मागील महिन्याभरापासून सुरुवात केलेली आहे.