आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी अग्निशमन अधिका-यांची राज ठाकरेंनी ऐरोलीत जाऊन घेतली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काळबादेवी आगीतील जखमी सुनील नेसरीकर आणि सुधीर अमिन या अग्निशमन अधिका-यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. आज सकाळी 9 च्या सुमारास राज नवी मुंबईकडे रवाना झाले. सकाळी पावनेदहाच्या सुमारास ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये त्यांनी नेसरीकर आणि अमिन यांच्या तब्बेतीची तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच या दोघांच्याही कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला. या घटनेत शहीद झालेल्या महेंद्र देसाई व संजय राणे यांच्या घरी जाऊन त्यांच्याही कुटुंबियांची भेट राज यांच्या पत्नी शर्मिला व मुलगा राज यांनी घेतली होती.
दरम्यान, दुपारी साडेआकराच्या सुमारास राज ठाकरे पुन्हा शहीद अग्निशमन अधिका-यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले. शहीद अग्निशमन अधिका-यांच्या कुटुंबियांना असे वा-यावर सोडता येणार नाही. मी मुंबईचे आयुक्त अजेय मेहता यांच्याशी त्यांना विमा, नोकरी व कायमस्वरूपी स्वत:चे घर देण्यात यावे यासाठी चर्चा करणार आहे, असे सांगितले.
मुंबईतील काळबादेवी भागातील गोकुळ इमारतीला लागलेल्या आगीत शनिवारी भायखळ्याच्या ब्रिगेड केंद्राचे प्रमुख महेंद्र देसाई आणि उपप्रमुख संजय राणे शहीद झाले होते. तर या घटनेत सुनील नेसरीकर आणि सुधीर अमिन गंभीर भाजले होते. नेसरीकर या घटनेत 50 टक्के भाजले आहेत तर अमिन 90 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक 24 तास उपचार करीत आहे. अमिन यांच्यावर आज एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
‘गोकुळ’ दुर्घटनेतील गंभीर जखमी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर आणि उपप्रमुख सुधीर अमीन या लढवय्या अधिकार्‍यांची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. अमीन यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे तर नेसरीकर यांनाही श्‍वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत आहे, असे ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील केसवाणी यांनी सांगितले.
अमीन आणि नेसरीकर यांना शनिवारी पहिल्यांदा मुंबईच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले. अमीन हे या आगीत 90 टक्के तर नेसरीकर 50 टक्के भाजले आहेत. या दोन्ही अधिकार्‍यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या टीमने फक्त दोनच तास विश्रांती घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी आमच्या टीमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉ. सुनील केसवाणी यांनी दिली.