आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेच्या भ्रष्टाचारात भाजपही तितकाच जबाबदार, राज ठाकरेंचा हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवसेनेने मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार तर केलाच आहे, मात्र गेली २५ वर्षे त्यांच्या सोबतीने सत्तेत असलेला भाजपही या भ्रष्टाचारात तितकाच जबाबदार अाहे,’ अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपला प्रामुख्याने लक्ष्य केले. तसेच नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.  

निवडणुकीच्या आखाड्यात दोन कोंबडे झुंजत असल्याचे सांगत राज म्हणाले की, शिवसेना आणि भाजपमधल्या भांडणाचा महापालिकेशी आणि मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याशी काहीही संबंध नाही. निवडणुकीनंतर हेच दोघे सत्तेचे दाणे टिपायला पुन्हा एकत्र येतील. २५ वर्षे सत्तेत राहूनही अजून हे दोन्ही पक्ष मुंबईसाठी अमुक करू किंवा तमुक करू अशीच आश्वासने देत अाहेत. पण इतक्या वर्षांत केले काय याबद्दल मात्र कुणीही काहीही बोलायला तयार नाही.’
 
शिवसेनेवर तोंडसुख घेताना राज म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे पोस्टर लावून शिवसेनावाले म्हणतात की, ‘जे बोलतो ते करून दाखवतो’. पण बाळासाहेबांनी ती बाब त्यांच्या कर्ततृत्वाने सिद्ध केली होती, तुम्हाला अजून ते सिद्ध करायचे आहे. तुमचा भ्रष्टाचार बाळासाहेबांच्य नावाखाली खपवू नका, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. महापाैर बंगला, टॅब घोटाळा, रस्त्यांवरील खड्डे अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.

पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक भाषणे केली. त्यात पंतप्रधान म्हणाले होते की, या निर्णयामुळे पुढील वर्षी एक नवा भारत दिसेल. पण अजून तरी कुणालाच नवा भारत दिसलेला नाही. सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे करून, त्या रांगांमध्ये तब्बल दोनशे जणांचे बळी घेऊन, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या घालवून, पंतप्रधानांनी काय साधले याचे उत्तर दिले पाहिजे. आपणही या मुद्द्यावरून केंद्र सरकारला जाब विचारला पाहिजे, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.  

नाशिकच्या विकासाचा दाखला: राज यांनी नाशिक महापालिकेत मनसेने केलेल्या विकासकामांची जंत्री सादर केली. नाशिक महापालिकेला दोन वर्षे आयुक्त नसतानाही आम्ही जे केले ते इतर कोणत्या शहरात, इतर कोणत्याही पक्षाने केले आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. या वेळी त्यांनी नाशिकमधील डम्पिंग खत प्रकल्प, मुकणे धरण पाणीपुरवठा योजना, बॉटनिकल गार्डन, होळकर पूल प्रकल्प, गोदावरी प्रकल्प यासारख्या प्रकल्पांचा विशेषत्वाने उल्लेख केला.
बातम्या आणखी आहेत...