आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेच्या प्रश्नांवर राज ठाकरे 5 वर्षांनी उतरले रस्त्यावर; गर्दीचा प्रतिसाद निम्म्याने घटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोठा गाजावाजा आणि जाेरदार तयारी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढलेल्या माेर्चाला सामान्य मुंबईकरांमधून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ पक्षातील कार्यकर्तेच दिसून अाले. त्यातही मुंबईबराेबरच राज्यभरातील कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे तरी काही प्रमाणात गर्दी जमवण्यात मनसेला यश अाल्याचे दिसले.  दरम्यान, जमावबंदीचा अादेश माेडल्याने पाेलिसांनी माेर्चा अायाेजकांवर गुन्हा दाखल केला अाहे.

रझा अकादमीच्या विराेधात २०१२ मध्ये मनसेने राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत भव्य माेर्चा काढला हाेता. पाेलिसांवर रझा अकादमीकडून झालेल्या हल्ल्याची त्याला पार्श्वभूमीवर हाेती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह असंख्य सामान्य मुंबईकरही त्वेषाने या माेर्चात सहभागी झालेले दिसले. यानंतर पाच वर्षांनी जनतेचे प्रश्न घेऊन राज ठाकरे मुंबईत रस्त्यावर उतरलेले दिसले. २०१२ च्या तुलनेत गुरुवारच्या माेर्चाची गर्दी निम्मीही नव्हती, अशी माध्यमांचे प्रतिनिधी व खुद्द मनसे कार्यकर्त्यांमध्येही चर्चा हाेती. २०१४ मध्येही राज ठाकरेंनी टाेलच्या निमित्ताने अांदाेलन पुकारले हाेते, मात्र त्या वेळी पाेलिसांनी रस्त्यावर उतरण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेऊन नंतर साेडून दिले हाेते. मनसेचा आंदोलनांतील सातत्याचा अभाव, राजकीय भूमिकांमधील धरसोडपणा आणि  घटलेली राजकीय ताकद या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम मनसेच्या मोर्चातील गर्दी रोडावण्यात झाला आहे. 

त्यातच मोर्चानंतर रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने राज ठाकरेंचा करिष्मा अाता घटल्याची चर्चा सुरू झाली आहे.    एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकावर आठवड्याभरापूर्वी झालेल्या दुर्घटनेबाबत संताप व्यक्त करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्याची घोषणा केली. हा फक्त मनसेचा मोर्चा नसून रेल्वे व्यवस्थापनाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी या मोर्चात सर्वसामान्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन राज यांनी केले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून मनसेचे कार्यकर्ते मुंबईच्या सर्व उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये फिरून प्रवाशांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत होते. या पार्श्वभूमीवर मनसेच्या मोर्चाला चांगली गर्दी जमेल त्यात सामान्य मुंबईकरांची संख्याही माेठी असेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, गुरुवारी निघालेल्या या मोर्चातील उपस्थिती यथातथाच असल्याने मनसेचा भ्रमनिरास झाला आहे. 

राज ठाकरेंनाही करावी लागली गर्दीची प्रतीक्षा  
पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मनसेच्या माेर्चाला साधारण आठ ते दहा हजार लोक उपस्थित होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, दुपारी बारानंतरही मोर्चाच्या प्रारंभस्थळी केवळ दोन ते अडीच हजार लोक उपस्थित होते. तुरळक उपस्थिती असल्याने राज ठाकरेंचेही आगमन दुपारी दीड वाजेपर्यंत लांबले होते. अखेर राज ठाकरेंच्या सहकुटुंब उपस्थितीनंतर दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली.

रेल्वेकडून कोणतेही ठोस आश्वासन नाही   
मनसेच्या मोर्चानंतर रेल्वे प्रवासी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरे यांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. या चर्चेअंती व्यवस्थापनाकडून कोणतेही ठोस आश्वासन राज ठाकरे यांना न मिळाल्याने फक्त निषेधाव्यतिरिक्त या मोर्चातून मनसेच्या हाती फारसे काही लागले नाही. आपला मोर्चा हाणून पाडण्यासाठी रेल्वेच्या फेऱ्या कमी केल्या गेल्या, तसेच अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत राज यांनी कमी गर्दीचे खापरही प्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...