आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे लढवणार केवळ नऊ जागा; भिवंडीसह दोन उमेदवारांची लवकरच घोषणा होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या लोकसभा निवडणुकीत 12 जागांवर उमेदवार उभे केलेल्या मनसेने यंदा मात्र फक्त नऊ जागांवरच लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मावळ मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी पक्षाने सात उमेदवारांची नावे जाहीर केली असून, लवकरच उर्वरित दोघांची नावे जाहीर होतील.

ऐनवेळी लोकसभा निवडणुका लढवण्याचा आपला निर्णय जाहीर करत मनसेने शिवसेना आणि भाजपची चांगलीच पंचाईत केली होती. भिवंडीमधून सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळू मामा आणि ठाण्यातून अभिजित पानसे यांना मनसेतर्फे उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. तर मावळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा देण्याचे मनसेने निश्चित केल्याची माहिती पक्षातल्या सूत्रांनी दिली.

महायुतीच्या जागावाटपात भिवंडीची जागा भाजपला सुटली असून तिथे अजूनही योग्य उमेदवार भाजपला मिळालेला नाही. शिवसेनेच्याच एखाद्या पदाधिकार्‍याला तिथून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे कळते. मात्र मित्रपक्षातून उमेदवार आयात करायला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. अशा वेळी भाजपतर्फे आयात केलेल्या उमेदवाराला भाजपची उमेदवारी मिळाल्यास नाराज भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची छुपी मदत मनसेच्या उमेदवाराला होऊ शकते. तसेच सुरेश म्हात्रे यांचे या भागात सर्व पक्षातल्या नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता मनसेला त्याचा फायदा होऊ शकेल, असा अंदाज मनसे नेतृत्वाचा असल्याचे कळते.

ठाण्यातून अभिजित पानसे
ठाण्यात मनसेकडे राजन राजे आणि सतीश प्रधान यांच्यानंतर त्या तोलामोलाचा नेता नाही. ठाण्यात शिवसेनेची चांगलीच ताकद असल्याने नुकतेच सेनेतून मनसेत आलेल्या पानसेंना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मावळमध्ये सध्या अपक्ष आमदार असलेले लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. जगताप यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.

मोहन रावले पुन्हा ‘राज’भेटीला
काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या माजी खासदार मोहन रावलेंनी शुक्रवारी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अर्ध्या तासाच्या या बैठकीत राज आणि रावले यांच्यादरम्यान राजकीय चर्चा झाल्याचे समजते. रावले यांनी दक्षिण मुंबईतून आपल्याला उमेदवारी द्या, मी ती जागा काढतो, असे राज ठाकरेंना सांगितल्याचे कळते. मात्र तिथून अगोदरच बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर झालेली असल्याने राज यांनी त्यांना नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.