आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Mumbai, Divyamarathi

मनसेचे आंदोलक दोनच्या आत घरात; राज यांचे दोन पावले मागे, आज चर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनात मनसेचे प्रमुख राज ठाकरे स्वत: उतरणार. त्यामुळे मुंबईसह राज्यातील वाहतूक ठप्प होणार, पोलिसांची दैना उडणार.. त्यांना अटक केल्यास आगडोंब उसळणार.. असे चित्र निर्माण करणार्‍या मनसेच्या आंदोलनाचा फुगा चारच तासांत फुटला. दरोडेखोरांशी चर्चा करणार नसल्याचे मंगळवारी म्हणणार्‍या राज यांनी बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलन सोडून घर गाठले व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चेचे निमंत्रण स्वीकारले. गुरुवारी सकाळी 9 वाजता ही चर्चा होईल. आंदोलनाचा मुंबईत फज्जा उडाला असला तरी मराठवाड्यासह राज्यात मात्र जोर दिसला.
प्रातिनिधिक असले तरी आंदोलन खणखणीत असेल, असे राज यांनी म्हटले होते. परंतु खुद्द राज नेतृत्व करत असतानाही मनसेच्या आंदोलनाने मुंबईत तासाभरात मान टाकली. राजसह सर्व आंदोलक दोन वाजण्यापूर्वीच घरी पोहोचल्याने आंदोलनाचा बार फुसका ठरल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू झाली. मला अटक करून दाखवा, असे आव्हान राज्य सरकारला देणार्‍या राज यांना सरकारने ताब्यात घेतले आणि नंतर सोडूनही दिले. जनतेचा फारसा पाठिंबा मिळाला नाही म्हणून 2009 च्या निवडणुकीत असलेला राज यांचा करिष्मा ओसरत असल्याची चर्चा आहे.

राज सकाळी 10 वाजता वाशीच्या दिशेने निघाले, पण वाटेतच चुनाभट्टीजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी तासभर ईस्टर्न एक्स्प्रेस वेवरची वाहतूक रोखून धरली. आरसीएफ पोलिस ठाण्यात राज यांना दोन तास स्थानबद्ध करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना गुरुवारी सकाळी 9 वाजता सहय़ाद्री अतिथिगृहावर आमंत्रित केले आहे. त्यामुळे राज यांच्यासह इतर आंदोलकांना पोलिसांनी मुक्त केले.

उद्देश सफल झाला
टोलबाबतचा सगळा भ्रष्टाचार सरकारच्या नजरेस आणून देण्याचा उद्देश या आंदोलनाने सफल झाला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, आता आंदोलन मागे घेत आहे.
-राज ठाकरे, मनसे प्रमुख