आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- तारीख 12 फेब्रुवारी... वेळ सकाळी आठ वाजताची.. मुंबईच्या दादर भागातील शिवाजी पार्क परिसरातले राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान.. जवळपास शंभरेक पोलिसांनी ‘कृष्णकुंज’कडे जाणारे दोन्ही मार्ग बॅरिकेड्स लावून अडवून धरले... या बॅरिकेड्सच्या बाहेर मनसे कार्यकर्ते आणि मीडियावाल्यांची मोठी गर्दी...आंदोलक, पोलिस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींच्या नजरा राज यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर खिळून होत्या...अखेर दहाच्या सुमारास ही प्रतीक्षा संपली..
पोलिसांनी पोझिशन्स घेतल्या.. माध्यम प्रतिनिधींनी गलका केला... राज पत्नीसह प्रवेशद्वाराच्या बाहेर आले... आधीच तैनात असलेल्या मर्सिडीझमधून तडक वाशीच्या दिशेने निघाले... त्यांच्या गाडीच्या पाठोपाठ मग पोलिस व्हॅन्स, माध्यमांच्या गाड्या आणि आंदोलकांच्या दुचाकींचा ताफा... ही वाहनांची रांग मग वाशीच्या दिशेने सुसाट धावू लागली... सोबतीला गाड्यांच्या हॉर्नचे आवाज... सोबतीला हे क्षण कॅमेर्यात कैद करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार्या कॅमेरामन्सच्या आरोळ्या, कार्यकर्त्यांच्या घोषणा असा हा सगळा माहौल... दादर, माटुंगा आणि शीव ठाण्यांची हद्द ओलांडत हा ‘राज’ताफा शीव उड्डाणपुलावरून उतरू लागला.. नाट्य इथेच घडणार होते.. चुनाभट्टी हद्दीवर अगोदरच तैनात पाचशे पोलिसांच्या तुकडीत तातडीने हालचाली सुरू झाल्या.
रस्त्याच्या कडेला उभी असलेली पोलिसांची एक भिंत काही क्षणातच हलली आणि रस्त्याच्या मधोमध उभी ठाकली... त्यापाठोपाठ पाच सहा व्हॅन्स रस्त्यावर आडव्या झाल्या... पोलिसांच्या हालचालीने कोंडी झालेल्या आंदोलकांनी एव्हाना सरकार विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली होती. राज ठाकरे यांच्या गाडीतून आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उतरले... पोलिस अधिकार्यांशी चर्चा करून त्यांचा निरोप मग गाडीत बसलेल्या ‘साहेबां’ना दिला. पुढे काय याचा अंदाज येईपर्यंत पांढर्या शुभ्र सदरा लेंग्यातले राज ठाकरे मर्सिडीझमधून खाली उतरून कार्यकर्त्यांच्या गराड्यात पोलिस व्हॅनमध्ये जाऊन बसले.. (जणू सारे काही ठरल्याप्रमाणेच)... लगोलग रस्त्यात उभ्या केलेल्या पोलिसांच्या गाड्याही हटवल्या गेल्या आणि राज ठाकरेंना ताब्यात घेऊन निघालेली पोलिस व्हॅन आरसीएफ पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाली.. आंदोलकांना मात्र तिथेच रोखण्यात आले होते... येथील गोंधळात आणखी अर्धा तास गेला...
राज आरसीएफ ठाण्यात पोहोचवल्याचा संदेश वॉकीटॉकीवरून आला आणि मग पोलिसांनी आंदोलकांचा मार्ग मोकळा केला.. मग पुन्हा घोषणाबाजी करत गर्दीचा लोंढा पोलिस ठाण्याच्या गेटवर थडकला... गर्दी पांगवण्यासाठी पोलिसही कामाला लागले.. अखेर आंदोलनाचा भर ओसरल्यावर दोन तासांनी पोलिसांनी राज ठाकरेंना मुक्त केले.. बाहेर पडताच ते माध्यमांना सामोरे गेले... मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी चर्चा करणार असल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली... आणि गाड्यांचा ताफा पुन्हा ‘कृष्णकुंज’कडे धावू लागला..!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.