आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Mumbai, Maharashtra

TOLL ANALYSIS: का यासाठीच केला होता अट्टाहास? मनसेची \'टोल\'खोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन एक वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असेच टोलविरोधी आंदोलन पुकारले होते. प्रत्येक टोलनाक्यावर दिवसरात्र बसून मनसैनिकांनी वसूल होणाऱ्या टोलचे गणित मांडले होते. त्याचा चिठ्ठापिठ्ठा सार्वजनिक बांधकाम खाते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर खोलण्यात आला होता. परंतु, सरकारी यंत्रणेकडून मिळालेल्या थातूरमातूर आश्वासनांनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आता पुन्हा 'अचानक' टोल विरोधी आंदोलनाची हवा करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दृष्टिक्षेपात असल्याने 'अचानक' सुरू झालेल्या आंदोलनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचाच घेतलेला आढावा...
काही वर्षांपूर्वी मनसेने टोलविरोधी आंदोलन पुकारले होते. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली होती. त्याचा पहिला भाग म्हणजे मनसैनिकांनी प्रत्येक टोल नाक्यावर जमा होणारा टोल मोजला होता. त्याची रितसर नोंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी मनसैनिक दिवसरात्र टोलनाक्यांवर बसून होते. काही दिवसांनी संपूर्ण राज्यातून गोळा करण्यात आलेला डाटा राज ठाकरे यांना सोपविण्यात आला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा डाटा त्यांना सोपविला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणेकडून मिळालेल्या थातूरमातूर आश्वासनांवर विश्वास ठेवत राज ठाकरेंनी आंदोलन मागे घेतले होते. या आंदोलनाची एवढी मोठी तयारी करण्यात आल्यावर अगदी सहज हे आंदोलन कसे काय मागे घेण्यात आले, असा प्रश्न तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेला पडला होता. राज्य सरकार आणि मनसेने सोईस्कर भूमिका घेऊन आंदोलन मिटविल्याची चर्चाही रंगली होती. आंदोलन स्थगित झाल्यानंतर टोल विरोधाची चर्चा शमली. सवईप्रमाणे हे आंदोलनही विस्मरणात गेले.
परंतु, कोल्हापूरच्या लोकांनी टोल विरोधी आंदोलन केल्यानंतर मनसेच्या थिंकटॅंकमध्ये पुन्हा एकदा या आंदोलनाची हवा जोर धरू लागली. सुरवातील कार्यकर्ते आंदोलनात उतरले. विषयाच्या तीव्रतेची चाचपणी केल्यावर राज ठाकरे आंदोलनाचे नेतृत्व करण्यास तयार झाले. त्यांनी वाशी टोलनाका निवडला. त्याची अप्रत्यक्ष जाहिरात करण्यात आली. परंतु, टोलनाक्यावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अटक केली. आता आंदोलन चिघळणार असे वाटू लागले. परंतु, मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाल्यावर राज यांनी आंदोलन स्थगित केले.
या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलविले आहे. त्यांची वेळ मिळाली आहे, असे सांगत राज यांनी आंदोलन मागे घेतले. मुळात मुख्यमंत्र्यांनी राज यांना चर्चेसाठी आधीच निमंत्रण दिले होते. केवळ वेळ ठरलेली नव्हती. त्यामुळे केवळ वेळ ठरविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होतो. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर लगेच आंदोलन स्थगित करण्याची भाषा राज यांनी कशी काय केली, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. दोघांची अशी कोणती चर्चा झाली, की राज यांनी लगेच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला? वाहतूकदार संघटनांनी पाठिंबा दिला असतानाही त्यांना विश्वासात न घेता आंदोलन कसे काय मागे घेण्यात आले? या प्रश्नांचा उलगडा येत्या काही दिवसांत होईल.
भाजप-शिवसेना युतीत रामदास आठवले यांचा रिब्लिकन पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सामिल झाली आहे. या महायुतीची संयुक्त सभा काही दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीची हवा असल्याचे चित्र उभे करण्यात आले. मनसेने कोणत्याही आघाडीत किंवा युतीत सामिल न होण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील थेट लढतीत मनसेचा बळी जातो, की काय अशी शंका तेव्हा व्यक्त केली जात होती. त्यामुळे मनसेचे अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी आणि महायुतीची हवा काढण्यासाठी राज यांनी आंदोलन तर पुकारले नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
टोल वसूलीच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे, हे अगदी उघड गुपित आहे. परंतु, राजकीय पक्षांनी अगदी निवडणुकांपूर्वी हा मुद्दा उपस्थित करून आंदोलन सुरू केल्याने या पक्षांच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. पाच वर्षांच्या काळात शांत राहणाऱ्या राजकीय पक्षांना केवळ निवडणुका तोंडावर आल्यावर कशी काय चेतना येते, अशी चर्चा रंगू लागली आहे. टोल बंद व्हावा हे सर्वांना हवे आहे. परंतु, त्याचा कुणी राजकीय लाभ घेणार असेल तर जनता अशा भुलथापांना बळी पडणार नाही. कारण आता जनता तेवढी सुज्ञ झाली आहे, हे मात्र नक्की.