आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Mumbai, Maharashtra

गारपिटीच्या मदतीतून निवडणूक निधी काढू नका -राज ठाकरे यांचा टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘गारपिटीमुळे राज्याच्या बहुतांश भागात अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या भागाला मदत जाहीर करावी. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांना मनसेचा संपूर्ण पाठिंबा आहे,’ अशी घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केली. ‘मदत जाहीर करताना सरकारने या पैशांतून आपल्या निवडणुकीचा निधी काढू नये,’ असा टोलाही राज यांनी सत्ताधार्‍यांना लगावला.

मनसेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करताना राज यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबाही जाहीर केला. राज यांच्या या भूमिकेवर राजकीय वतरुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

नितीन गडकरींकडून स्वागत
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेचे स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले. काही दिवसांपूर्वीच गडकरींनी राज यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. भाजप नेते विनोद तावडे यांनी मनसेच्या या भूमिकेमुळे महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार अजिबात संभ्रमित होणार नसल्याची हमी दिली. काँग्रेस आघाडीला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आपण निवडणूक लढवू नये ही गडकरींची विनंती राज यांनी मानली नाही. त्यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेच; पण तरीही मराठी मते महायुतीसोबतच राहतील, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.

कवाडेंनाही राज यांचे आकर्षण
राज्यात ‘रिपाइं’चे चार गट आहेत. पैकी रामदास आठवले महायुतीत असून प्रकाश आंबेडकर ‘आप’सोबत जाण्याच्या तयारीत आहेत. गवई गट स्वतंत्रपणे निवडणुका लढवतो आहे. चौथा कवाडे गट मात्र ‘मनसे’च्या तिसर्‍या आघाडीत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे कळते. शनिवारी प्रा. जोगेंद्र कवाडे ‘कृष्णकुंज’वर पायधूळ झाडणार होते; परंतु काही कारणाने त्यांचे जाणे लांबणीवर पडले. कवाडे गटाने लोकसभेच्या 21 जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. मात्र, मनसे, शेकाप, जनसुराज्य यांच्या आघाडीत संधी मिळण्याची त्यांना आशा आहे. तसे झाल्यास आपल्या छोट्या गटाचेही राज्यात खाते उघडले जाईल, असा प्रा. जोंगेद्र कवाडे यांना विश्वास वाटतो आहे.

खरा चेहरा समजला : आझमी
राज ठाकरे प्रांतवादी आहेत, धर्मवादी नाहीत. असे चित्र निर्माण केले जात होते; परंतु ज्या व्यक्तीने गुजरातमध्ये नरसंहार घडवला, त्या मोदींना पंतप्रधान बनण्यासाठी राज यांना आता पाठिंबा दिला आहे. या घोषणेमुळे बाळासाहेब ठाकरे व उद्धव यांच्याप्रमाणेच राजही हिंदुत्ववादीच असल्याचे सिद्ध झाले. त्यांचा सांप्रदायिक चेहरा समोर आला आहे, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी दिली.