आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणुकीच्या आधी जातीय दंगलीचा धोका; राज ठाकरेंनी मांडले भाकीत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘विधानसभा निवडणुकीच्या आधी जातीय दंगली घडवल्या जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी सावध राहून समाजकंटकांचा हा डाव हाणून पाडावा,’ असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केले. मनसेची ब्लू प्रिंट तयार झाली असून येत्या दहा ते पंधरा दिवसात तिचे सादरीकरण आपण स्वत: करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभरातील मनसे पदाधिकार्‍यांचा मेळावा गुरुवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात घेण्यात आला. पक्ष स्थापनेपासून चर्चेत असलेली मनसेची ब्लु प्रिंट अखेर तयार झाली असून येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या जनेतेसमोर ती सादर केली जाणार असल्याची घोषणा यावेळी राज यांनी केली. या ब्लु प्रिंटच्या माध्यमातून राज्याचा भविष्यातल्या पन्नास वर्षांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच आपण एक राज्याव्यापी दौरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यात या ब्लु प्रिंटचे सादरीकरण करणार असल्याचेही राज म्हणाले. या ब्लु प्रिंटबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांची मतेही जाणून घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.
लोकसभेच्या पराभवाबाबत राज म्हणाले की, जे झाले ते झाले. अशा पराभवाने काही बिघडत नाही. पुन्हा नव्या जिद्दीने लढाईला सज्ज व्हा. मुंबईतील फेरीवाला धोरणाबाबत ते म्हणाले की, केंद्राच्या नव्या धोरणानुसार सर्वेक्षण सुरू होताच अचानक मुंबईतल्या फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. यामागे परप्रांतियांना या शहरात वसवण्याचा डाव आहे. मात्र महापालिका अधिकार्‍यांच्या विरोधात आंदोलने करा आणि हा डाव उधळून लावा, असे आदेशही राज यांनी कार्यकर्त्यांना दिले.

शिवसेनेवर टीका
सध्या दिल्लीत सुरू असलेल्या महाराष्ट्र सदनाच्या वादाबद्दल बोलताना राज यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. झालेला प्रकार मुद्दाम केला नसेल, पण महाराष्ट्र सदनातल्या अपुर्‍या सुविधांवर भडकून उठणारी हीच शिवसेना राज्यातल्या अपुर्‍या सुविधांबाबत गप्प का? असा सवाल त्यांनी केला.

मोदींकडे गेलेले मतदान आता मनसेला
भाषणात आपल्या आईचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘मध्यंतरी आपल्या आईला काही लोक भेटले होते. त्यांनी सांगितले की, लोकसभेत आम्ही मोदींना मतदान केले, पण राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच आम्ही मनसेलाच मतदान करणार आहोत.’