आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- राज्यभर आंदोलनाचा फज्जा उडाल्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलबाबत चर्चा केली. या वेळी 10 कोटी खर्चाच्या आतील 28 टोलनाके बंद करण्याचे आश्वासन चव्हाणांनी त्यांना दिले. हे आपल्याच आंदोलनाचे यश असल्याचा राज ठाकरेंचा दावा आहे. मात्र ‘सरकारी पातळीवर ही प्रक्रिया अगोदरपासूनच सुरू होती’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना र्शेय देणे नाकारले. दरम्यान, टोलनाके बंद करण्याचे आश्वासन पूर्ण होईपर्यंत मनसेचे कार्यकर्ते टोल भरणार नसल्याची घोषणाही राज यांनी पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी अल्पकाळ का होईना राज्यभर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी राज ठाकरे यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. या चर्चेनंतर राज्यातील एकूण 28 टोलनाके बंद करण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचा दावा राज यांनी केला आहे. यात 10 कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प किंमत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे 22 टोलनाके आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या सहा टोलनाक्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आतच हे टोलनाके बंद केले जाणार आहेत.
‘बीओटी’चा फेरविचार होणार
राज्यातील रस्त्यांची स्थिती खराब असल्याचे मान्य करत राज्याचे टोल धोरण राबवताना आपल्याकडून काही चुका झाल्याची कबुलीही खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच ’बीओटी’ धोरणाचाही पुनर्विचार करणार असल्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केल्याचे राज ठाकरे म्हणाले. या चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विभागाला फार कमी निधी दिला जात असल्याने खासगीकरणाच्या माध्यमातून कामे करावी लागत असल्याचा मुद्दा मांडला.
टोल वसुली केल्या जाणार्या नाक्यावरील वाहनांची मोजणी करणारी अद्ययावत यंत्रणा उभी करा, सर्वच टोलनाक्यांचे ऑडिट करा, तोपर्यंत हे सर्व नाके बंद ठेवा, वसुली थांबवलेल्या नाक्यांवरील बूथ आणि इतर बांधकाम त्वरित पाडून टाका आदी मागण्या राज ठाकरेंनी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे 21 फेब्रुवारीला मनसेतर्फे मंत्रालयावर काढण्यात येणारा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे, असेही राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
प्रश्न सरकारने सोडवावा, मी नाही
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही टीका केली. कोल्हापूरला झालेले आंदोलन हे शिवसेनेचे नव्हते, तर ते लोकांचे आंदोलन होते, असा टोलाही त्यांनी लगावला. टोल आंदोलनात मनसे आणि काँग्रेसची मिलीभगत असल्याच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले की, अशा गोष्टी पसरवायला कितीसा वेळ लागतो. ‘आयआरबी’वाले मला भेटण्यासाठी प्रयत्नशील आहेतच पण हा प्रश्न सरकारने सोडवायचा आहे, त्यामुळे कंत्राटदारांशी बोलून मी काय करू. नितीन गडकरी आणि माझी भेट ही माझ्यात आणि आयआरबीचे मालक म्हेैसकर यांच्यात समझोत्यासाठी नव्हती असा खुलासाही त्यांनी केला.
सरकारचे धोरण पूर्वीचेच : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार अगोदरपासूनच टोल धोरणाचा पुनर्विचार करत आहे. या अगोदर अण्णा हजारे यांनी केलेल्या तक्रारीनंतरच आम्ही ही प्रक्रिया सुरू केलेली आहेच. आम्ही नेहमीच चर्चेसाठी तयार होतो. चर्चेने हा प्रश्न सोडवायचा किंवा तोडफोडीने हे त्यांनी ठरवायचे होते, असा टोलाही त्यांनी मनसेला हाणला.
जबरदस्ती केल्यास घरात घुसू
नव्या टोलधोरणात सुधारणा करण्याच्यादृष्टीने काही तांत्रिक मुद्दय़ांचा समावेश असलेले एक निवेदन मनसेतर्फे येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण होईपर्यंत कोणीही टोल भरू नये, असे आवाहनही राज यांनी जनतेला केले. तसेच जर एखाद्या माणसाला टोल भरायचा नसेल आणि कंत्राटदाराने जबरदस्ती केली तर त्याच्या घरात घुसून आम्ही काय धिंगाणा घालतो ते पाहाच, असा इशाराही त्यांनी दिला.
हे टोलनाके होणार बंद
1) शेरीनाला (कृष्णा नदी पूल) सांगली- अशोक बिल्डकॉन- 7.50 कोटी
2) सांगली-मिरज-म्हैसाळ डिमेन्शन- 6.20 कोटी
3) सोलापूर-अ.कोट-मैदर्गी-बॉर्डर रोड बी.बी. इन्फ्रा- 4.15 कोटी
4) नागपूर रस्ता रुंदीकरण जयवंतसिंग ओबेरॉय- 7.50 कोटी
5) करमाळा-मांगी बायपास एनकोटी टोल रोड 6.75 कोटी
6) टाकळी-कासेगाव-अनवली अशोक बिल्डकॉन 6.30 कोटी
7) सातारा-पंठरपूर-मोहोळ मिर्शा असोसिएट्स -9.76 कोटी
8) बार्शी-सोलापूर रोड (भोगावती पूल) गणेश बिल्डर्स -3.62 कोटी
9) अहमदनगर-आष्टी -रोहन राजदीप इन्फ्रा- 5.12 कोटी
10) चुंबळी-फाटा-पाटोदा -मौर्या इन्फ्रा -2.37 कोटी
11) शिरुर-ताजबंद-मुखेड -कल्याण टोल- 8.18 कोटी
12) औंढा-चौंडी-वसमत -कल्याण टोल -5.50 कोटी
13) तुळजापूर-उजनी -शिवरत्न इन्फ्रा -8.00 कोटी
14) तुळजापूर-नळदुर्ग -लोकमंगल इन्फ्रा -3.82 कोटी
15) अदान-स्वाशीन-पूस -जयसिंग ओबेरॉय -4.40 कोटी
(वरील सर्व नदीवरचे पूल आहेत)
16) शेगाव-बाळापूर-बुलडाणा -जी. एन. टिक्कर- 1.19 कोटी
17) सुरत-धुळे -अशोक बिल्डकॉन- 5.14 कोटी
18) जळगाव रेल्वे ओव्हरब्रीज (अंकलेश्वर बुरहाणपूर) बी. एन. अगरवाल- 4.81 कोटी
19) दोंडाईचा रेल्वे ओव्हरब्रीज (औरंगाबाद -सोलापूर हायवे) रोहन राजदीप इन्फ्रा- 4.25 कोटी
20) अहमदनगर दौंड बोरसे ब्रदर्स -5.50 कोटी
21) रेल्वे ओव्हरब्रीज (सटाना-मालेगाव-चाळीसगाव) सुशील कन्स्ट्रक्शन -7.30 कोटी
22) धुळे-अमळनेर-चोपडा - कॉम्पॅक्ट बिल्डर्स -3.80 कोटी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.