आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानडी अत्याचार अस्मिता, मग मीच संकुचित कसा? राज ठाकरेंचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -‘सीमाभागातील मराठी बांधवांवर तिथले सरकार आणि कन्नडिगांचे जे अत्याचार सुरू आहेत, तो त्यांच्या अस्मितेचा भाग असल्याचे सांगितले जाते. तेच जेव्हा मी इथे महाराष्ट्रात करतो तेव्हा मात्र मी संकुचित कसा ठरतो?’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी उपस्थित केला. ‘या अत्याचाराबाबत केंद्र सरकार बोलत नाही. आता तरी त्यांनी हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा,’ अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करावा तितका थोडा असल्याचे सांगत राज ठाकरेंनी मराठी माणसांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कर्नाटक सरकार मराठी भाषकांशी ज्या पद्धतीने वागते आहे, तसाच प्रकार मी जर परप्रांतीयांबरोबर इथे केला तर देशभरात केवढा गहजब माजेल. जेव्हा ते वागतात तेव्हा त्यांच्या अस्मितेचा अभिमान असल्याचे बोलले जाते. मात्र त्याच भूमिकेतून काही केले की मी संकुचित कसा ठरतो, असा सवालही त्यांनी या वेळी केला. या प्रकरणाची गंभीर दखल आता केंद्र सरकारने घेतलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी करत त्यांनी भाजपलाही खडे बोल सुनावले आहेत. या मुद्दय़ावर ऊठसूट पत्रके काढणार्‍या भाजपला कधीच या प्रश्नात रस नव्हता. आता महाराष्ट्रातून इतके खासदार निवडून गेले आहेत तेव्हा मला बघायचेच आहे की, हा सीमाप्रश्न आता तरी सुटतो की नाही ते, असा टोलाही त्यांनी लगावला.

आधीच्या भूमिकेपासून मनसेचे घूमजाव
दोन वर्षांपूर्वी बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री यांची निवड रद्द ठरवल्याच्या निषेधार्थ छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या वेळी ‘सीमाभागातल्या मराठीजनांना महाराष्ट्रात येण्याचा अट्टहास का?’ असा सवाल करत ‘आपल्या भूमिकेचा इतक्या वर्षांनंतर पुनर्विचार करा,’ असा सल्ला राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर सीमाभागातल्या मराठी जनतेत नाराजीची लाट पसरल्यानंतरही ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. मात्र आज अचानक त्यांनी आधीच्या भूमिकेपासून घूमजाव करत मराठी भाषकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.