मुंबई- मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने व उद्यानासाठीच्या आरक्षित जागा बड्या धेंडांच्या घशात घालू देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी सेना-भाजपला दिला आहे.
गुरुवारी मुंबई महापालिकेत सेना-भाजप व प्रशासनाने नव्या मैदान धोरणाला मंजुरी दिली होती. मात्र, मनसेसह राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसेने पालिका मुख्यालयात क्रिकेट खेळून तर राष्ट्रवादीवे आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून निषेध केला आहे.
दरम्यान, आज दुपारी राज ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपला याला विरोध असल्याचे सांगितले. राज ठाकरे म्हणाले, मुंबईतील मोकळ्या जागा या शहराची गरज आहे. ती फुफ्फुसे म्हणून काम करतात. येथे नागरिकांना जाता आले पाहिजे. मोकळ्या जागांचा खासगी वापर करणे किंवा संस्था, संघटनांना जागा देणे चुकीचे आहे. हळू हळू ते जागा बळकवतात व त्याचा व्यावसायिक वापर करून ते त्या जागा गिळंकृत करतात असा अनुभव आहे. पालिकेच्या नवीन प्रस्तावानुसार मुंबईतील मैदाने, बागांसाठी राखीव असलेले मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव म्हणजे मुंबईतल्या जागा खासगी बिल्डर्सना देण्याचा सत्ताधारी शिवसेना-भाजपचा घाट असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
सत्ताधारी शिवसेना-भाजपने हा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा मनसे जोरदार आंदोलन करेल. सभागृहात प्रस्ताव मंजूर झाला असला तरी रस्त्यावर तो मंजूर होऊ देणार नाही. याविरोधात मनसे मुंबईभर स्वाक्षरी मोहिम राबवेल व नागरिकांची मते आजमावून आंदोलन उभे करेल असा इशारा राज ठाकरेंनी दिला. मुंबईतील झाडांच्या मुळावर अॅसिड टाकून ती मारली जात असल्याचे राज यांनी सांगितले.