आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Plans To Launch MNS Mouthpiece Daily Maratha News In Marathi

मनसेचे मुखपत्र \'दै. मराठा\' लवकरच, राज ठाकरे दिसतील संपादकांच्या भूमिकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपले काका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात दिसते. अाता काकांच्याच पावलावर पाऊल टाकत राज हे संपादकाच्या नव्या भूमिकेत दिसणार अाहेत. ते लवकरच एक नवे मराठी वृत्तपत्र सुरू करत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मुख्य संपादक खुद्द राज ठाकरेच असणारे हे नवे वृत्तपत्र मनसेचे मुखपत्र असेल.
उत्तम वक्ता, आंतराष्ट्रीय दर्जाचा व्यंगचित्रकार, एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष.. अशा अनेक रूपात आपण राज ठाकरेंना पाहिले आहे. मात्र, आता ते संपादकांच्या भूमिकेत समाेर येणार अाहेत. येत्या चार-सहा महिन्यांत राज ठाकरे नवे मराठी वृत्तपत्र काढणार अाहेत. पक्षाचे मुखपत्र असलेल्या या वर्तमानपत्राच्या उभारणीत राज यांनी स्वत: लक्ष घातले असून त्याच्या कार्यालयासाठी मध्य मुंबईत जागेचा शोध घेतला जात आहे.

हे जरी पक्षाचे मुखपत्र असले तरीही त्यात एखाद्या विरोधी पक्षाच्या बड्या नेत्याने राज ठाकरेंवर केलेल्या टीकेलाही स्थान असेल. खुद्द राज ठाकरे हे कलासक्त व्यक्तिमत्त्व असल्याने या वर्तमानपत्राची मांडणी, छपाई आणि दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असेल, अशी माहिती मनसेच्या एका बड्या नेत्याने दिली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदीरात आयोजित केलेल्या मनसेच्या चिंतन बैठकीत राज ठाकरेंनीच या वृत्तपत्राबाबतची घोषणा केली होती.

मुखपत्राची गरज का?
राज ठाकरे सध्या नव्याने पक्ष उभारणीच्या कामाला लागले आहेत. या प्रक्रियेत सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे कार्यकर्त्यांशी निरंतर संवाद साधणे. सध्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरेंना एखादा मेळावा, बैठक किंवा सभा आयोजित करावी लागते. त्यासाठी बराच वेळ आणि श्रम खर्च होतात. ही अडचण लक्षात घेऊन पक्षातल्या प्रत्येकापर्यंत कमीत कमी वेळेत पोेहोचणे सहज शक्य व्हावे यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे मुखपत्र सुरू करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

"मराठा' नाव असेल का?
काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आचार्य अत्रेंच्या मालकीच्या "मराठा' या वृत्तपत्राचे हक्क विकत घेण्याविषयी आचार्य अत्रेंच्या कन्या शिरिष पै यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे मनसेचे हे वृत्तपत्र ‘मराठा’ या नावानेच प्रसिद्ध होणार का याविषयी उत्सुकता आहे.

राज यांचे राेज व्यंगचित्र
या वृत्तपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे दरराेज पहिल्या पानावर राजकीय सद्य:स्थितीवर भाष्य करणारे दस्तूरखुद्द राज ठाकरेंचे व्यंगचित्र असेल. सध्या विविध वर्तमानपत्रांत येणारी राज ठाकरेंची राजकीय व्यंगचित्रे हा या तयारीचाच एक भाग असल्याचे मनसेच्या नेत्याने सांगितले .