आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड-जाळपोळ नाही, मनसेचा रास्तारोको प्रातिनिधीक; राज वाशी टोलनाक्यावर करणार नेतृत्व!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या (बुधवार) सकाळी नऊ वाजतापासून रस्तावर येणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. रविवारी पुण्याच्या सभेत त्यांनी 12 तारखेला राज्यभर रास्तारोको आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा केली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक गौप्यस्फोटही केला आहे. ते म्हणाले, सरकारच्या वतीने एका व्यक्तीने फोन केला होता, त्यांनी उद्याचे आंदोलन स्थगित करुन सरकारसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. राज यांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळला असून उद्या राज्यातील सर्व महामार्गांवर मनसे कार्यकर्ते रास्तारोको करतील, राज्यातील जनतेनेही यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

उद्याच्या रास्तारोकोनंतर 21 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतरही सरकारने टोल बाबतची भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याचे सांगत पुन्हा एकदा खळ-खट्याक होणार असल्याचा सरकारला इशारा दिला आहे.
राज ठाकरे स्वतः वाशी टोल नाक्यावर रास्ता रोको करणार आहेत. बुधवारी सकाळी नऊ वाजतापासून राज्यातील महामार्गांवर टोलविरोधात रास्तारोको सुरु होणार आहे. यामुळे जनतेला होणा-या त्रासाबद्दल राज यांनी आधीच माफी मागितली आहे. त्यासोबतच हा जनतेचा मुद्या असून त्यांच्यासाठी आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारसोबतची चर्चा माध्यमांच्या समोर केली जावी, अशी अटही राज यांनी घातली आहे. गेल्या वर्षी त्यांनी टोल विरोधी आंदोलन सुरु केले, आणि आता पुन्हा त्याच मुद्यावर ते रस्त्यावर येत आहेत. मध्यंतरीच्या काळात मनसे शांत का होती असा प्रश्न विचारला जात होता, त्यामुळे राज ठाकरे यांनी सरकार सोबतची चर्चा पत्रकारांसमक्ष करण्याची अट ठेवली आहे.

पत्रकार परिषदेत राज यांची टोलेबाजी
ज्यांच्यावर मच्छर मारल्याचा गुन्हा नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये, असे राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते व सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता सुनावले.
शिवसेनेचे मुखपुत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखात राज ठाकरे यांच्या आंदोलनाची खिल्ली उडविण्यात आली आहे. त्यासंबंधीच्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते.
दरोडेखोरांशी चर्चा काय करायची
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, माझा ज्यांच्यावर पैसे खालल्याचा आरोप आहे, त्या दरोडेखोरांशी काय चर्चा करायची. असा उलट सवाल राज यांनी पत्रकारांना केला.

मुख्यमंत्र्यांना चिंता जागा वाटपाची
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीत आहेत. त्यांना राज्याची कमी आणि जागावाटपाची चिंता जास्त असल्याचे राज म्हणाले.