आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदी निर्णयामुळे देश अराजकाकडे जाईल - राज ठाकरे, मोदी-पवार भेटीचाही घेतला समाचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देश पंचवीस ते तीस वर्षे मागे जाणार असून हे अराजकसदृश प्रकरण इतक्यात आवरेल असे वाटत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. पुढील काळ भीषण असेल. उद्योग बंद होतील, असंख्य लोकांच्या नोकऱ्या जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. सुरुवातीला राज म्हणाले की, नोटाबंदीच्या या निर्णयावर लोक माझी प्रतिक्रिया विचारत आहेत. भाजपचे नेते किंवा सरसंघचालक यावर काही बोलतात का याची मी वाट पाहत होतो. भागवत यांनी या निर्णयावर भाष्य करणे टाळल्याचे सांगत राज म्हणाले की, बोलणार तरी कसे? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या निर्णयावर नाराज आहे. भाजपवाले म्हणतात, हा निर्णय भविष्यासाठी चांगला आहे. त्यापैकी कुणीही किंवा पंतप्रधानही सांगत नाहीत की, निर्णय कसा चांगला आहे.

एवढा मोठा निर्णय घेताना केंद्र सरकारचे जे नियोजन आवश्यक होते, ते दिसत नाही. दररोज नवे नियम जाहीर केल्याने गोंधळ अधिक वाढला आहे. देशासाठी थोडा त्रास भोगायला हरकत नाही. पण काळ्या पैशावाल्यांच्या ज्या फाईली तुमच्याकडे आहेत, त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत, असा सवाल राज यांनी केला.
एका आर्थिक अहवालानुसार भारतात १६ ते १७ लाख कोटी रु. इतका काळा पैसा आहे. त्यापैकी फक्त ४५० ते ५०० कोटी रु. इतकी रक्कम बनावट चलनाच्या स्वरूपात अाहे. तो बाहेर काढण्यासाठी १७ लाख कोटी चलन व्यवहारातून काढून घेणे म्हणजे घरात दोन उंदीर झाले म्हणून अख्खे घर जाळण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी लगावला.
चौकट
राज ठाकरेंचे अडचणीचे सवाल?
- तुम्हाला काळ्या पैशाबद्दल तिरस्कार आहे म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला, मग २०१४ च्या निवडणुकीत तुमची शेकडो कोटींची जी प्रचार यंत्रणा राबली त्याचा हिशोब अजून का दिला नाही? तसेच त्यानंतरच्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडूच्या निवडणुकांचा खर्च कुणाच्या बँक खात्यातून चालवला होता?
- नोटाबंदीचा निर्णय जर दहा महिन्यांपुर्वी झाला होता, मग तुमची तयारी का नव्हती? नव्या नोटांवर दोन महिन्यापूर्वी गव्हर्नरपदी आलेल्या उर्जित पटेल यांची सही कशी?
- जेटलींनी लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्राद्वारे ८२ लाखांची रोकड दाखवली होती. ते जर आता त्यांच्याकडे असतील तर ते प्रति दिवस अडीच लाख याप्रमाणे बँकेत कसे भरणार?
- दहा महिन्यांपूर्वी निर्णय झाला तर नोटांच्या कागदांचे टेंडर आठ दिवसांपूर्वी कसे काढले?
मोदी-पवार यांच्यावर टीका
पुण्यात मोदींनी शरद पवार यांची स्तुती केली. यावर राज म्हणाले, मोदींना लोकांच्या त्रासाबद्दल गोव्यात हंुदका येतो. आपण पवारांचे बोट धरून राजकारणाचे धडे गिरवतो, असे ते म्हणतात. पवारांचे बोट धरून अजित पवारही राजकारणात आलेत. त्यांनी आणि तुम्ही धरलेले पवारांचे बोट एकच असेल तर देश खड्ड्यात जाईल ना.
बातम्या आणखी आहेत...