आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Thackeray Rally News In Marathi, Mumbai, Divvy Marathi,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंच्या सभेला प्रतिमाणशी 350 रुपये; पैसे दिले नाहीत, आदिवासींचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राजकीय नेत्यांच्या सभांना पैसे देऊन माणसे जमवावी लागतात, हा प्रकार महाराष्ट्राला नवा नाही. मात्र, काही नेतेमंडळींना ऐकण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक स्वयंस्फूर्तीने हजर होत असतात. त्यातीलच काही नावे म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दुसरे त्यांचे पुतणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. मात्र, नुकत्याच पुण्यात झालेल्या राज ठाकरेंच्या सभेसाठी मात्र प्रतिमाणशी 350 रुपये देऊन लोक जमा केले होते, असा गौप्यस्फोट ठाणे जिल्ह्यातील काही आदिवासींनी केला आहे.

कार्यकर्त्यांनी पैसे देण्याचे आमिष दाखवून सभेला नेले, मात्र परतल्यानंतर पैसे दिले नसल्याचा राग ठाणे जिल्ह्यातील काही आदिवासींनी व्यक्त केल्यानंतर मनसेचे बिंग फुटले. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र अपेक्षेप्रमाणे हे आरोप फेटाळले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी पुण्यात राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. प्रतिमाणशी 350 रुपये देण्याचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील जव्हार, वाडा, तालसरी व मोखाडी येथील 40 आदिवासी मजुरांना या सभेसाठी नेण्यात आले होते. मनसेचा कार्यकर्ता पंडित म्हात्रे याने आमच्याशी बोलणी केली होती, असा मजुरांचा दावा आहे.

‘सभेहून परतल्यानंतर दुपारी वसई या ठिकाणी येऊन पैसे घेऊन जावेत, असे पंडित म्हात्रेने सांगितले होते. 10 फेब्रुवारी रोजी हे मजूर पैसे नेण्यासाठी आले असता त्यांना कोणीही भेटले नाही. आम्ही हा प्रकार स्थानिक नेत्यांच्या कानावर घातला. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही,’ अशी तक्रार आदिवासी मजूर सुनील घायाळ यांनी केली.

गर्दी जमवण्याची गरजच काय?
आदिवासी मजुरांनी केलेल्या आरोपाचे स्थानिक मनसेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष कुंदन संख्ये यांनी मात्र खंडन केले आहे. ‘काही मजुरांनी याबाबत आम्हाला माहिती दिली आहे. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांना माणसे गोळा करण्याची गरज भासेल, असे मला वाटत नाही. मुळातच राजसाहेबांच्या सभेला गर्दी जमवण्याची आम्हाला कधीच गरज पडत नाही. पुण्याच्या सभेलाही राज्याच्या काना-कोपर्‍यातून मनसेचे कार्यकर्ते व राजसाहेबप्रेमी लोक मोठय़ा संख्येने आले होते,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.