आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Re Entry In Maharashtra Politics Issue

मनसे हिंदुत्वाच्या रुळावर; पुनरागमनासाठी राज ठाकरेंकडून चाचपणी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना प्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच अाक्रमक भाषणशैली आणि मराठी अस्मितेचा राजकारणासाठी वापर करूनही फारसे यश पदरात पडत नसल्याने अाता बाळासाहेबांसारखेच कट्टर हिंदुत्वाच्या वाटेवर जाण्याची चाचपणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत अाहेत. मराठी कार्ड वापरूनही राज ठाकरे यांना अपेक्षित यश मिळाल्याने मनसेचे ‘इंजिन’ अाता हिंदुत्वाच्या रुळांवर धावल्यास कितपत लाभ होईल, याचा अंदाज घेतला जात आहे.
आपण जन्माने हिंदू असल्याने हिंदुत्वासाठी कायम उभे राहूच, शिवाय आपल्या पक्षाच्या झेंड्यात असलेला हिरवा रंग भारताला मानणाऱ्या मुस्लिमांसाठी आहे. भिवंडी आणि बेहरामपाड्यातील मुस्लिमांसाठी नाही,’ असे वक्तव्य राज यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत गुरुवारी संवाद साधताना केले हाेते. हे वक्तव्य म्हणजे याच चाचपणीचा एक भाग असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

मनसेच्या स्थापनेला दशक होत आले असले तरी नाशिक वगळता फारसे माेठे यश या पक्षाला कुठेही मिळाले नाही. पक्षाच्या स्थापनेच्या वेळीच ‘आपण मराठी अस्मितेचे संकुचित राजकारण करणार नाही,’ असे संकेत देत राज ठाकरे यांनी अापल्या पक्षाच्या ध्वजावरही दलित, मुस्लिमांना स्थान दिले हाेते. वर्षभरातच सन २००७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज यांनी कुठेही मराठी अस्मितेचा मुद्दा केला नाही. मात्र, या निवडणुकीत मनसेचा धुव्वा उडाला आणि २०० हून अधिक सदस्य असलेल्या महापालिकेत मनसेचे अवघे नगरसेवक निवडून आले. या दणक्यानंतर राज ठाकरे यांनी राजकीय पुनरागमनासाठी आक्रमक मराठी अस्मितेचे कार्ड हाती घेतले अाणि काही काळातच त्यांची लाेकप्रियता वाढली. शिवसेनेपेक्षा आपणच कसे अधिक मराठी अस्मितावादी आहोत, हे आक्रमकपणे खळ्ळ-खट्ट्याक करत दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचा परिणाम म्हणून पहिल्यांदाच लढलेल्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ अामदार निवडून अाले, तर सन २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत २७ नगरसेवक निवडून अाले. मात्र, हे लाेकप्रतिनिधी पाच वर्षांत प्रभावी काम करू शकले नाहीत. पक्षाचे नेतेही अांदाेलनाची केवळ भाषा करायचे नंतर गुंडाळून घ्यायचे, असे झाल्याने मतदारांचा या पक्षावरील विश्वास उडाला. त्यामुळेच सन २०१४ च्या विधानसभेत मराठी अस्मितेच्या राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिक पुणे या शहरात मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. तसेच डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसे जवळपास संपली.
हे अपयश पुसून काढण्यासाठी राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाच्या मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवलेले दिसते.

खटाटाेप राजकीय अब्रू वाचवण्याचा
मराठीअस्मितेमुळेही मते मिळत नसल्याने राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेची चाचपणी सुरू केली अाहे. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड दिल्यास किमान अब्रू तरी वाचेल, असा त्यांचा अंदाज अाहे. हिंदुत्वाला पोषक वक्तव्य केल्यानंतर त्याची नेमकी काय प्रतिक्रिया येते? कितपत राजकीय फायदा होऊ शकतो, याचा अभ्यास सध्या राज ठाकरे करत आहेत. उद्या अापणच भाजप आणि शिवसेनेपेक्षाही अधिक कडवे हिंदुत्ववादी आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न ते करतील.