(छायाचित्र- राज ठाकरे)
मुंबई- विधानसभा निवडणुकीत उतरून नेतृत्त्व करेन अशी भीमगर्जना दोन महिन्यापूर्वी केल्यानंतर रविवारी नागपूर येथे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर आज सकाळी राज ठाकरेंनी पुन्हा घुमजाव केले.
आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे काल नागपूर येथे बोललो नसल्याचे सांगत माध्यमांनी याप्रकरणी विपर्यास करणारे वृत्त दिल्याचे राज ठाकरे यांनी आज सकाळी म्हटले आहे. निवडणूक लढवायची नाही याचा अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत येत्या 4-5 दिवसांत निर्णय घेऊ असेही राज यांनी म्हटले आहे.
विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखतींसाठी राज ठाकरे रविवारी नागपूर दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी विदर्भातील पक्षाची स्थिती समजून घेतली. तसेच किमान 40-45 जागी उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर कायम आहात काय? असा प्रश्न पत्रकारांनी राज यांना विचारला असता ते म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांची जेनिनटिकल समस्या अशी आहे की आम्ही सुरुवातीपासूनच कुठला एखादा मतदारसंघ आपला मानला नाही. आजोबांपासून ते बाळासाहेबांपर्यंत हेच चालत आले आहे. कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवली नाही. महाराष्ट्र हाच आम्ही मतदारसंघ मानला. त्यामुळे एखाद्या जागेवरून निवडणूक लढवण्याचा विचार केल्यास दुसऱ्या मतदारसंघाने काय पाप केले? असा भावनिक प्रश्न निर्माण होतो. आपल्या त्या घोषणेमागील भावना वेगळी होती. मात्र, त्यानंतर बराच विचार केला. मुंबईत लढायचा निर्णय घेतला तर विदर्भातून का नाही, असाही स्वाभाविक प्रश्न निर्माण झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे निवडणूक लढवायची तरी कोठून?’ असा प्रश्न उपस्थित करीत राज यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले होते.
दरम्यान, राज ठाकरेंच्या मनात निवडणूक लढविण्यावरून चलबिचल सुरु असल्याचे सांगत माध्यमांनी एकप्रकारे राज ठाकरेंवर टीका केली होती. त्याची चर्चा काल दुपारपासून सर्वच वृत्तवाहिन्यांत होती. टीव्ही वाहिन्या राज ठाकरेंचे लोकसभा पराभवानंतर झालेल्या पहिल्या सभेतील भाषणाची टेप दाखवत होते. तसेच राज ठाकरेंचा तो उत्साह दोन महिन्यात संपला काय अशी टीका सुरू केली होती. त्यानंतर आज सकाळी राज ठाकरेंनी याबाबत निवेदन प्रसिद्ध करून नागपूर येथे काल आपण बोललेल्या वक्तव्यांचा माध्यमांनी विपर्यास केला असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. याबाबत विचार सुरु असून येत्या 4-5 दिवसांत पुढील निर्णय घेऊ असे राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दांत घुमजाव करणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.