आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Trying To Make 3rd Front In Maharashtra

राज ठाकरे तिस-या आघाडीसाठी प्रयत्नशील; विनय कोरे-\'शेकाप\'च्या जयंत पाटलांशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत घेण्याची ओढाताण करीत असतानाच स्वत राज मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच एक तिसरी आघाडीच्या पर्यायाची चाचपणी करीत आहेत. त्यात त्यांना यश मिळत असून, राज्यातील इतर छोटे-छोटे पक्ष सोबत घेऊन मतदारांपुढे तिसरा पर्याय देण्याच्या तयारीत आहेत. त्याचाच भाग म्हणून शेकापचे नेते जयंत पाटील, कोल्हापूर पट्ट्यातील जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे मुंबईत कृष्णकूंजवर दाखल होत राज यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. त्यांच्यासोबत नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे हे देखील उपस्थितीत होते. विनय कोरेंनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच इतर काही छोटे घटक सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. याबाबत आताच बोलणे संयुक्तिक होणार नाही. काही दिवसांत आम्ही याबाबत माहिती देऊ, असे कोरेंनी स्पष्ट केले.
दोन दिवसापूर्वी नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. मात्र, मनसेमुळे होणारे मतविभाजन टाळण्यासाठी व काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी राज यांची भेट घेतली व त्यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा किंवा कमीतकमी उमेदवार उभे करावेत अशी विनंती केल्याचे गडकरींनी स्पष्ट केले होते. मात्र, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला राज-गडकरी यांची भेट पसंत पडली नव्हती. मात्र, गडकरींनी राज यांची भेट घेण्यात काहीही गैर नाही. मी एनडीएच्या फायद्यासाठीच गेलो होतो, ज्यात शिवसेनाही आहे असे सांगत सेनेने नाराज होण्याचे कारण नसल्याचे सांगितले होते. याचबरोबर विविध पक्षातील नेत्यांना मी भेटत असतो. शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह शेकापचे नेते व आमदार जयंत पाटील हे ही माझे चांगले मित्र आहेत, असे सांगितले होते.
आज राज यांच्या भेटीला जयंत पाटील पोहचल्याने गडकरींच्या चर्चेनंतरच काँग्रेस-राष्ट्रवादीला होणारा फायदा मोडून काढण्यासाठी तिसरी आघाडीचा प्रयत्न चालवलेला दिसत आहे. असे असले तरी राज्यात तिसरी आघाडी झाली तर त्याचा फटका नेमका कोणाला बसेल हे आताच सांगता येणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजप-सेना महायुतीला याचा फटका बसू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे.
राज ठाकरे सध्या राज्याच्या राजकारणात तिसरा पर्याय आहेत मात्र ते सध्या तरी सशक्त नाहीत. मनसेचे कार्यक्षेत्र मुंबई, नाशिक पुणे या शहरी पटट्यात आहे. मात्र शेकाप, जनसुराज्य पक्षाचा ग्रामीण भागात वर्चस्व आहे. त्यामुळे असे पक्ष एकत्र आले तर त्याचा एकमेंकाना फायदा होणार आहे. तसेच अशा पक्षांना चांगली ओळख मिळण्याची शक्यता आहे. महायुतीनेही गेल्या काही काळात आरपीआयच्या आठवले गटासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाला एकत्र घेऊन आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेचे लोकसभा निवडणुकीत फारसा निभाव लागणार नाही अशी चर्चा आहे. मात्र, जर राज यांनी सशक्त अशी तिस-या आघाडीचा पर्याय राज्यातील मतदारांपुढे ठेवला तर त्याचा फायदा सर्वच छोट्या पक्षांना होणार आहे. याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला बसणार असला तरी भाजप-सेनेलाही बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.