आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Visits In Marathawada For 10 Days From Today

निलंगा न्‍यायालयातील पेशीमुळे राज ठाकरेंना आठवला दुष्काळ, करणार दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसे प्रमुख राज ठाकरे आजपासून दहा दिवसासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर जात आहेत. - Divya Marathi
मनसे प्रमुख राज ठाकरे आजपासून दहा दिवसासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर जात आहेत.
लातूर - दुष्काळी लातूर जिल्ह्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे बुधवारी दौरा करणार आहेत. मात्र त्यांचा हा दौरा दुष्काळाची पाहणी करून सामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी आहे की निलंगा न्यायालयाने वॉरंट जारी केल्यामुळे तेथे हजर राहण्यासाठी आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी माणसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी आंदोलन छेडले होते. त्या वेळी तत्कालीन जिल्हा संघटक अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली निलंग्यात आंदोलन झाले होते. त्या वेळी पोलिसांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर एसटी बसेस जाळण्यात आल्या होत्या. याप्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी निलंगा ठाण्यात राज ठाकरे आणि अभय साळुंके यांच्यावर आंदोलनाला चिथावणी दिल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात न्यायालयाने बुधवारी राज ठाकरे आणि अभय साळुंके यांना हजर राहण्यासंबंधी वॉरंट जारी केले आहे. त्यासाठी राज ठाकरे बुधवारी निलंग्यात येत आहे.

पेशीच्या सणात दुष्काळाचा सत्यनारायण
गेले चार महिने भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्याचा दौरा राज ठाकरे करणार असे वृत्त पक्षाकडून देण्यात आले. मात्र, अख्खे मंत्रिमंडळ येऊन गेल्याला महिना उलटल्यानंतर राज ठाकरेंना लातूरचा दुष्काळ आठवला अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, राज यांचा दौऱ्याचे निमित्त हे जुन्या प्रकरणातील वॉरंट आहे हे त्यांच्या बुधवारच्या लातूर दौऱ्यावर नजर टाकल्यावर दिसून येेेते. मुंबई-लातूर एक्स्प्रेसने बुधवारी सकाळी सात वाजता लातूरला आल्यानंतर राज ठाकरे हे थेट विश्रामगृहावर जाणार आहेत. तेथे नऊ वाजता मनसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत ते दुष्काळावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर विश्रामगृहातच ते मनसेच्या वतीने दोन मोफत पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू करतील. तीन हजार लिटर क्षमतेच्या काही टाक्यांचे ते लोकार्पण करतील आणि थेट निलंग्याकडे रवाना होतील. तेथे न्यायालयात हजेरी लावल्यानंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जळकोटकडे रवाना होणार आहेत. लातूरमध्ये आल्यानंतर लोकांशी चर्चा, शेतकऱ्यांच्या भेटी, एखादे निवेदन याचा त्यांच्या दौऱ्यात समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या येण्याचा हेतू न्यायालयाचे वॉरंट आहे की दुष्काळ? अशी चर्चा होते आहे.
पक्ष सोडून गेलेल्या साळुंकेची भेट होणार?
शिवसेनेत विद्यार्थी सेनेत असल्यापासून राज ठाकरेंसोबत असलेले अभय साळुंके मनसेच्या स्थापनेच्या वेळीही राज ठाकरेंसोबत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर साळुंके यांनी मनसेचे जिल्हाध्यक्षपद सोडून शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, न्यायालयाने बुधवारी राज ठाकरे आणि अभय साळुंके या दोघांनाही वॉरंट बजावले आहे. यानिमित्ताने ठाकरे आणि साळुंके समोरासमोर येणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र अभय साळुंके राज ठाकरेंना सामोरे जाण्यापेक्षा बुधवारी न्यायालयात गैरहजर राहणेच पसंत करतील असा अंदाज वर्तवला जातोय.
मनसे वाटणार तीन हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या
मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण हे मराठवाडा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या 3000 लिटर्सच्या टाक्या वाटणार आहेत. या टाक्यांची पहिली कुमक 3 ट्रकद्वारे 25-30 टाक्या घेवून बुधवारी लातूर जिल्ह्यात पोहचेल. तर त्यानंतर दोन दिवसांनी आणखी 50 टाक्या घेवून बीड जिल्ह्यात वाटल्या जातील. मुंबई महापालिकेच्या सर्व नगरसेवक स्व:खर्चातून बीड जिल्ह्यातील 2 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे बंधारे घालून देणार आहेत अशी माहिती महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. ही फक्त सुरुवात आहे. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौ-यावर गेल्यानंतर परिस्थितीचे अवलोकन करून मदतीचा नवीन तपशील जाहीर केला जाईल असेही मनसेने म्हटले आहे.
ऐनवेळी सोलापूरचा दौरा घुसडवला-
मराठवाड्यासोबतच राज ठाकरे सोलापुरात दोन दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत. बुधवारी ते सोलापूरात असतील. जळकोट येथे दुष्काळी भागाची पाहणी करतील. तेथे गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात करतील. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात येईल. 100 पाण्यांच्या टाक्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय आत्महत्या केलेल्या दोघा विडी कामगार महिलांच्या कुटुंबीयांना आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका महिलेस आर्थिक मदत देण्यात येईल.
गुरुवारी सकाळी नऊ वाजता परंडा येथे ते रवाना होतील. परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर भागाची पाहणी करून परतणार आहेत. सायंकाळी पाच वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील ओढा रुंदीकरण गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करणार आहेत. शुक्रवारी सकाळी तुळजापूरमार्गे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पुढे स्लाईडसच्या माध्य़मातून पाहा, राज ठाकरे 10 दिवस मराठवाड्यात कोणत्या दिवशी कुठे फिरणार...