आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार-तटकरेंना वाचविण्यासाठी भुजबळांचा बळी- राज ठाकरेंचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- रत्नागिरीसह कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तरीही राज यांनी कोकणाचा दौरा सुरूच ठेवला आहे.)
रत्नागिरी- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचविण्यासाठी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना बळीचा बकरा बनवला जातोय की काय?अशी भीती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यासह देशातील इतर ऊर्जा कंपन्यांकडून सुपारी घेऊनच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोपही राज यांनी केला.
राज ठाकरे सध्या कोकण दौ-यावर आहेत. रत्नागिरीसह कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तरीही राज यांनी कोकणाचा दौरा सुरूच ठेवला आहे. मंगळवारी सायंकाळी रत्नागिरीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज म्हणाले, महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड प्रकरणी छगन भुजबळांवर कारवाई सुरु आहे ते योग्यच आहे. याअगोदरही आम्ही भुजबळांच्या गैरव्यवहाराबद्दल भूमिका मांडली होती. विधानसभेच्या प्रचाराच्या काळात भुजबळांच्या घोटाळ्याबद्दल तपशील जनतेसमोर सादर केला होता. त्यामुळे ही कारवाई योग्यच आहे. पण यातही राजकारण असण्याची शक्यता जास्त आहे. भुजबळांवर कारवाई होत असताना ज्यांच्या भ्रष्ट्राचाराचा उल्लेख करून सत्तेत आले त्या अजित पवार व सुनील तटकरेंना वाचवण्यासाठी तर भुजबळांचा बळी दिला जात नाही ना या संशयाला वाव आहे.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे त्यावरून राज यांनी सेनेला फटकारले आहे. ते म्हणाले, शिवसेना सत्तेत आहे ना, मग जैतापूरविरोधात आंदोलने कसली करता?. जैतापूर प्रकल्पासाठी भू-संपादन प्रक्रिया झाली तेव्हाच या प्रकल्पाला विरोध का झाला नाही? जपानमध्ये भूकंप झाला म्हणून जैतापूरलाही होईल असा तर्क मांडण्यात अर्थ नाही. मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र आहे. मुंबईत भूकंप झाला तर काय होईल? याचा विचार कधी कोणी केला आहे का? राज्यासह देशातील इतर ऊर्जा कंपन्यांकडून सुपारी घेऊनच जैतापूर प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप राज यांनी केला.
कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी दोन ते तीन मोठे व्यवसाय येणे आवश्यक आहे. मनसेच्या विकास आराखडय़ात याचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभेत आलेल्या अपयशाचा उत्साहावर कोणताच परिणाम झालेला नाही. कोकण दौ-याला यश मिळाले आहे. काही ठिकाणी बदल करणे आवश्यक असून दौरा पूर्ण होताच बदलाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...