मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे
लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी
आपल्या पक्षाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’ मधील राज्याचा स्वायत्ततेचा मुद्दा योग्यच आहे, असे त्यांनी सांगितले.पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे आणि राज्यातील विधानसभा निवडणुका प्रादेशिक पक्षांनी लढवाव्यात. यापुढे माझा पक्ष लोकसभा निवडणुका लढवणार नाही. स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य नाही.
राज्यांतील विषय राज्यांनीच हाताळावेत आणि आंतरराज्य विषय केंद्राकडे सोपवावे, असा त्याचा अर्थ असल्याचे राज यांनी स्पष्ट केले. सर्वच पक्ष मैदानात उतरले असल्याने या वेळी निकालाबाबत कोणतेही भाकीत करता येत नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. निवडणूकपूर्व सर्वेक्षणे एक तर पैसे देऊन केलेली असतात किंवा तो काही लोकांच्या मनाचा खेळ असतो, असे राज म्हणाले. राज्य विकासाबाबत मागे पडल्याच्या भाजपच्या जाहिरातींना राज यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही आघाडीवरच आहे, पण इतर राज्यांच्या तुलनेत गेल्या १५ वर्षांत विकास खुंटला, असे मत त्यांनी नोंदवले.