आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मरण्याआधी मारा’ वक्तव्यावरून गदारोळ, राज यांच्या वक्तव्याची कायदेशीर तपासणी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकरी आत्महत्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या विधानाची कायदेशीर तपासणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपने जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून उचलल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.
‘आत्महत्या करायचीच असेल, तर ज्यांच्यामुळे तुमच्यावर कर्जबाजारीपणाची वेळ आली त्यांना आधी मारा आणि मग आत्महत्या करा,’ असे वक्तव्य राज ठाकरे यांनी यवतमाळमधील जाहीरसभेत केले होते. या वक्तव्यावरून सुरू झाला आहे. राज्य सरकारने वक्तव्याची दखल घेतली असून या वक्तव्याची कायदेशीर तपासणी सुरू आहे. त्यात काही आक्षेपार्ह आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहेत, ते वाद सोडवण्याचा आपले ज्येष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. शिवाय समन्वय समितीच्या माध्यमातूनही प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, 48 पैकी फार तर एक-दोन मतदारसंघांत अशी परिस्थिती असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
मनसेबरोबर छुप्या समझोत्याचा शिवसेनेने विचार करावा
क्षीण होत चाललेल्या शिवसेनेबरोबर भविष्यात राहायचे नाही, असा विचार भाजपने केलेला दिसतो आहे. म्हणूनच मनसे आणि भाजपचा जो छुपा समझोता झाला आहे, त्यानंतर आता किती काळ हा अपमान सहन करायचा याचा विचार शिवसेनेने करायला हवा, असा सल्लाही त्यांनी सेनेला दिला. शिवाय असा छुपा समझोता झाल्याने आता ज्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार आहे, तिथल्या शिवसैनिकांनी काय करायचे या विषयीचे आदेशही सेना नेतृत्वाने द्यावेत, असेही ते म्हणाले.
निवडणुकीच्या तोंडावर वेगळ्या विदर्भाला पाठिंबा!
राष्ट्रवादीने विदर्भासारख्या छोट्या राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा दिला आहे, तुमची भूमिका काय असे विचारताच स्थानिक जनभावना आणि व्यवहार्यता लक्षात घेऊन छोट्या राज्यांची निर्मिती करायला हरकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. विदर्भातल्या दहा मतदारसंघांत येत्या गुरुवारी होत असलेले मतदान पाहता मुख्यमंत्र्यांनी विदर्भाबाबत आपली भूमिका बदलली का, असा सवाल त्यामुळे राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
भाजपचा जाहीरनामा म्हणजे उचलेगिरी
मुख्यमंत्र्यांनी या वेळी भाजपच्या जाहीरनाम्यावरही टीका केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे जसेच्या तसे उचलत भाजपने उचलेगिरी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जाहीरनाम्यातील विकास किंवा हिंदुत्व या मुद्दय़ावर संभ्रमित असलेल्या भाजपची अवस्था ना इकडे, ना तिकडे अशी झाली आहे, असे ते म्हणाले. भाजपमध्ये तिकीट वाटपादरम्यान जी नाराजी दिसून आली, ती पाहता पक्षात किती वैचारिक गोंधळ आहे, हेच दिसून येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. एकीकडे मोदी विकासाची भाषा बोलतात आणि अमित शहा सुडाची भाषा बोलतात, मग भाजपचा खरा चेहरा कोणता, याचे उत्तर देण्याचे आव्हान त्यांनी भाजपला दिले. राज्यात तरी कोणतीही मोदी लाट दिसत नसल्याचे सांगत सर्वेक्षणातून काहीही पुढे येत असले, तरी काँग्रेस आघाडी सध्या आहे त्यापेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवाय सध्या चर्चेत असलेल्या ‘आप’चाही फारसा परिणाम राज्यात होईल, असे वाटत नसल्याचेही ते म्हणाले.