आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackrey Rally Issue Politics News In Marathi

गर्दी ओसरल्याने ‘राज’सभा घटणार! भिवंडीप्रमाणे 10 सभा रद्द होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या निवडणुकीत गर्दीचे विक्रम रचणारे मनसे नेते राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसादच थंडावला असून, इतक्या जाहीर सभांमध्ये नवे काय बोलायचे, अशी कोंडीही राज यांची झाली आहे. मुंबईत मंगळवारी झालेल्या एका सभेला पाच हजारांचीही गर्दी न जमल्याने राज यांनी पुढील किमान 8 ते 10 प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून बुधवारी भिवंडी येथील तसेच नाशिक येथील दोन नियोजित जाहीर सभाच रद्द करण्याची नामुष्की मनसेवर ओढवली आहे.
सुरुवातीला 30 ते 35 सभा घेणार असल्याचे राज यांनी जाहीर केले होते. त्यापैकी दहा-बारा सभा झाल्या असून उर्वरित 20 ते 22 सभा होणे अपेक्षित होते. मात्र आठ ते दहा सभा कमी करण्याचे निर्देश खुद्द राज यांनीच दिले आहेत.
मंगळवारी दक्षिण मध्य मुंबईतले उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्या प्रचारासाठी नायगाव इथे आयोजित सभेला तर तुरळक प्रतिसाद मिळाला. पाच हजार क्षमतेचे सदाकांत ढवण मैदान अर्धेही भरू शकले नाही. संध्याकाळी वर्साेव्यातली सभा आटोपून राज ठाकरे या नायगावच्या सभेला येण्यासाठी निघाले होते, पण मैदानच भरले नसल्याचा निरोप आल्याने राज ठाकरे काही काळ आपल्या घरी थांबल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. शेवटी महत्प्रयासाने थोडी अधिक गर्दी जमल्यानंतर ते सभास्थानी आले.
आपल्या ठाकरी शैलीने 2009 सालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका गाजवणारे राज यंदा मात्र त्या फॉर्मात दिसत नाहीत. परप्रांतियांना केलेली मारहाण व मराठी अस्मितेचे राजकारण, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज यांच्याबद्दल जनतेच्या मनात असलेली नवलाई या वेळी जवळपास नसल्याने राज यांचे गर्दीचे गणित चुकले आहे. यंदा प्रचार मोहिमेच्या सुरूवातीला झालेली पुण्यातली सभा आणि नंतरच्या दोन-चार सभा वगळता गेल्या काही दिवसातील मनसेच्या सभांना अपेक्षित गर्दी न जमल्याने राज सध्या अस्वस्थ आहेत. सुरवातीच्या सभा वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपित केल्याने गर्दी कमी होत असल्याचे कारण जरी मनसे पदाधिकारी पुढे करत असले, तरी मनसेच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. अर्थात यापूर्वीच्या राज यांच्या सभाही अशाच थेट प्रक्षेपित होत असल्या तरी तेव्हा मात्र त्यांना ऐकायला गर्दी होत होती. रविवारच्या नाशकातील सभांनाही यथातथाच प्रतिसाद होता. त्यावेळी तर खुद्द राज यांनीच आपल्या भाषणात कमी गर्दी असल्याचा उल्लेख केला होता. यामुळे प्रचाराच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात राज यांच्या सभांची संख्या कमी करण्यात येणार आहे. शिवाय भाषणात तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा येत आहेत. नवे काही ऐकायला मिळत नसल्याने गर्दी कमी होत असावी असा पक्षातील काही नेत्यांचा तर्क आहे. स्वत: राज यांनाही आता नवे काय बोलावे असा प्रश्न पडल्याचे जाणवते. यवतमाळच्या वादग्रस्त ठरलेल्या 25 मिनिटांच्या भाषणात तर कार्यकर्त्यांना दरडावणे, शांत राहण्यास बजवाणे आणि पॉज घेणे असे करण्यात त्यांनी किमान 10 मिनिटे घालवली. या सभेला गर्दी होती मात्र त्यांना बांधून ठेवणारे भाषणही राज यांना करता येत नव्हते.
सभांचे फेरनियोजन करत आहोत : मनसे
मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष आणि राज यांच्या सभांचे नियोजन पाहणारे मनोज चव्हाण यांना याबाबत विचारले असता त्यांनी सभांचे फेरनियोजन करण्यात येत असल्याचे मान्य केले. भिवंडी येथील सभा रद्द झाली नसून ती पुढे ढकलण्यात आली आहे. काही ठिकाणी दोनऐवजी एकच सभा होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
राज यांच्या प्रतीक्षेत इतरांच्या भाषणांचा रतीब
वर्सोवा येथील सभा आटोपून राज थेट नायगावात येणार हे गृहीत धरून सभेचे नियोजन झाले होते. पण या सभेला गर्दी नाही असा निरोप मिळताच राज थेट घरी म्हणजे दादरला गेले. गर्दी जमेपर्यंत साहेब नायगावला येणार नाहीत हे स्पष्ट झाले. पण तोवर नियोजित भाषणे झाली होती. मग वेळ काढण्यासाठी आदित्य शिरोडकर, महिला आघाडीच्या आशा मामेडी, शिल्पा सरपोतदार यांची भाषणे झाली. तरी राज यांची येण्याची चिन्हे दिसेनात. मग बाळा नांदगावकर घाईघाईत भाषणाला उभे राहिले. तेवढ्यात राज आले, पण गर्दी नसल्याने मूड गेलेल्या राज यांचे भाषण रंगलेच नाही.
पुढील स्लाइडमध्ये, यवतमाळमध्ये राज ठाकरे यांच्यावर गुन्हा