आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज यांची दहा वर्षांपूर्वीचे पत्र वाचून कार्यकर्त्यांना भावनिक साद, प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सातत्याने होत असलेल्या पक्षगळतीच्या समस्येवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आता भावनिक आवाहनाची मात्रा लागू हाेते काय, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली अाहे. मनसेच्या राज्यातील निवडक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी दहा वर्षांपूर्वी पक्षस्थापनेच्या वेळी आपल्या समर्थकांना उद्देशून लिहिलेल्या जुन्या पत्राचे पुन्हा एकदा जाहीर वाचन केले. या पत्रातील भावुक शब्दांनी मनावर फुंकर घालत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागण्याचा अादेश दिला आहे.

मनसेच्या राज्यभरातील तब्बल सव्वातीनशे पदाधिकाऱ्यांचे तीनदिवसीय शिबिर नुकतेच पनवेलच्या रिसॉर्टमध्ये पार पडले. या शिबिराच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे मोठे आव्हान सध्या राज ठाकरेंसमोर असून तोच धागा पकडत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी पक्षस्थापनेच्या वेळी आपली भूमिका कार्यकर्त्यांना समजावून देण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या पत्राची प्रतच त्यांनी आपल्यासोबत आणली होती. हे संपूर्ण पत्र त्यांनी आपल्या तासाभराच्या भाषणात वाचून दाखवले.

शिवसेना आणि बाळासाहेबांना सोडण्याचा निर्णय कसा मानसिक क्लेश देणारा, मात्र आपल्या सर्वांच्या राजकीय भविष्यासाठी कसा आवश्यक होता, याबाबतचे विवेचन या पत्रात करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर राजकीय पक्षात जाण्यापेक्षा मनसे स्थापन करण्यामागची भूमिकाही या पत्रात सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे राज ठाकरेंनी त्या वेळी या पत्रात मांडले होते. कार्यकर्त्यांची त्या वेळची भावनिक स्थिती लक्षात घेऊन लिहिलेल्या या पत्रात अनेक आवाहने राज यांनी अतिशय भावुक शब्दांत केली होती. या पत्राच्या जाहीर वाचनानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नव्याने कामाला लागण्याचे आवाहन केले. या पत्राच्या प्रतीसुद्धा या वेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

मनसेच्या शेतकरी सेनेची स्थापना
शुक्रवारच्या भाषणात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची स्थापना करत असल्याची घोषणा केली. या अंगीकृत संघटनेच्या प्रमुखपदी पुरंदर येथील बाबाराव जाधव या मनसे पदाधिकाऱ्याची नियुक्ती करत असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. ही संघटना ग्रामीण भागात आणि विशेषत: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करेल, असे जाहीर करत लवकरच या संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाईल, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...