आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिकार्‍यांची माहिती देणार्‍यांना 2 लाख, वाघ वाचवण्यासाठी राज ठाकरेंची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्याचा दौरा करून आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तेथील वाढत्या शिकारी रोखण्यासाठी शुक्रवारी इनाम जाहीर केले. शिकार्‍यांची माहिती देणार्‍याला मनसेतर्फे 2 लाख रुपये, तर शिकार्‍यांची ‘शिकार’ करणार्‍यांना 5 लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी नागपुरात केली.

दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पास भेट देऊन तेथील वाढत्या शिकारींबाबत माहिती घेतली होती. तसेच वनमंत्री पतंगराव कदम यांच्या कारभारावर टीकाही केली होती.

आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले की, आपल्या राज्यातील नेत्यांना वन्यप्राण्यांच्या संरक्षणाशी काही देणे-घेणे उरलेले नाही. ते जमीन लाटण्यातच व्यस्त आहेत. मात्र वाघांच्या शिकारींना स्थानिक लोकही जबाबदार आहेत. बाहेरचे शिकारी इथे येऊन तळ ठोकून बसतात आणि वाघांची शिकार करतात. स्थानिकांच्या मदतीशिवाय घनदाट जंगलात सापळा रचणे त्यांना कसे शक्य आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

रालोआच्या बंदवर प्रतिक्रिया देताना राज म्हणाले की, ‘बंद’चा सरकारवर कोणताही परिणाम होत नाही. हे हत्यार आता बोथट झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे देशात एवढे खासदार असताना ते केंद्र सरकारला पेट्रोल दरवाढीसंदर्भात संसदेत जाब विचारत नाहीत की चर्चाही करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगवर व्यक्त केलेल्या भावनांचीही भाजपच्या नेत्यांनी दखल घ्यायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज यांना उत्तर देण्यास बांधील नाही : पतंगरावआज राज ठाकरे काही घोषणा करत आहेत, उद्या आणखी कोणी काही म्हणेल, मी प्रत्येकाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी केवळ मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला बांधील आहे, असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना अनुशेषातून वगळण्याच्या सरकारच्या मागणीविषयी ते म्हणाले की हा विषय संवेदनशील आहे. आम्हाला सर्वच योजना पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी निधी आणायची जबाबदारी आमची आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज करणार ताडोबा- दुष्काळी भागाचा दौरा