आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांना दत्तक घेतलयं ते काय नाशिकला दत्तक घेणार : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना प्रतिटोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पक्षाला पहिल्यांदा सत्ता मिळाल्यानंतर पाच वर्षांत नाशिकमध्ये विकासकामे करून दाखविली. जाहीर सभांत त्यामुळेच हो मी नाशिकचा विकास केलाय हे छातीठोकपणे सांगतोय. आता नाशिकला कुणाचे नेतृत्वच नाही. या शहराला कुणी वालीच नाही म्हणून मी नाशिकला दत्तक घेतोय, असे मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या सभेत जाहीरपणे सांगितले. पण, ज्यांना स्वत:लाच आधी दत्तक घेतल गेलयं ते काय नाशिकला दत्तक घेणार असे म्हणत राज यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाची खिल्ली उडवली. 

दादर येथे जाहीर सभेत राज यांनी शिवसेनेसोबतच मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील सभेला एकही श्रोता नसल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. मुख्यमंत्री नेहमी पारदर्शी कारभाराबद्दल बोलत असल्याचा उल्लेख करत राज म्हणाले की, पुण्यातल्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या जरी दिसत असल्या तरीही त्यावर माणसे बसली होती. पण सगळा कारभार पारदर्शक असल्याने ती दिसत नव्हती. मुख्यमंत्र्यांनाही ती दिसल्याने मुख्यमंत्र्यांनी ती सभाच रद्द केली, अशी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत आपण केलेली भाजपकुमार थापाडे ही टीका मुख्यमंत्र्यांना खूपच बोचल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नकल्या असे म्हटले. पण, माझ्यासमोर जर त्यांच्यासारखीच व्यंगचित्रे असतील, तर मी व्यंगचित्रेच काढणार ना, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांची चांगलीच फिरकी घेतली. 

मुंबईत बिल्डर्सना हव्या तेवढ्या जागा मिळतात, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अजूनही जागा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली सध्या शिवसेनेचा महापौर निवास हडपण्याचा डाव आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला. मुंबईतील दादर येथे झालेल्या शेवटच्या जाहीरसभेत त्यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. बाळासाहेबांच्या नावाने नाशिक शहरात आपण त्यांच्या नावाला शोभेल असे स्मारक उभारल्याचे सांगत नाशिक शहरात राज ठाकरेच्या नावाने एक इंच जमीन जरी सापडली तर राजकारण सोडून देईन, असे जाहीर अाव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. 
महापालिका निवडणुकांच्या प्रचार मोहिमेची सांगता करताना आपल्या शेवटच्या जाहीरसभेत राज ठाकरेंनी विरोधकांवर टीका करतानाच नाशिकमधील विकासकामांचे सादरीकरण केले. 

पाच वर्षांत नाशिक महापालिकेवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, हेच आपले यश असल्याचे सांगत नाशिकप्रमाणेच मुंबई आणि इतर शहरातही आपण विकास करू, या आश्वासनाचा त्यांनी पुनरुल्लेख केला. शिवसेनेवर तोंडसुख घेताना राज म्हणाले की, सत्तेतून बाहेर पडण्यासाठी शिवसेना अजून कोणत्या अपमानाची वाट पाहतेय. राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहायचे आणि आपला सरकारच्या धोरणांना विरोध आहे, असे फक्त भासवायचे, हा शिवसेनेचा उद्योग सध्या चालला आहे. यांच्यातील भांडणे फक्त तुम्हाला-आम्हाला दाखवायला आहेत. शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरतायत. पण बाहेर मात्र काढत नाहीत. कोणतीही कामे दाखवता येत नाहीत म्हणून तुमचे लक्ष हटवण्यासाठीही सगळी ढोंगे चालली आहेत, अशी टीका त्यांनी केली. 
 
जाहिरातींचा खर्च आला कुठून? 
जाहिरातींवरशिवसेना आणि भाजपने केलेल्या कोट्यवधींच्या खर्चावरही राज यांनी सवाल उपस्थित केले. दहा महानगरपालिकांसाठी प्रमुख मराठी दैनिकांत पूर्ण पान जाहिरात द्यायची असेल तर दिवसाचा खर्च साधारण साडेसात ते आठ कोटी रुपये असल्याचे सांगत राज म्हणाले की, गेले आठ-दहा दिवस हे दोन्ही पक्ष पानभर जाहिराती देत आहेत. शहरात रस्त्यांच्या दुतर्फा होर्डिंग्ज लावत आहेत. टीव्हीवर जाहिरातींचा भडिमार सुरू आहे. नोटाबंदीच्या काळात हा जाहिरातीचा खर्च आला कुठून? असा सवाल त्यांनी केला. नोटबंदी ही फक्त तुमच्यासाठी आहे, पैसा मात्र भाजपकडे आहे. ‘कॅशलेस भारत’ या घोषणा फक्त कागदावर आहेत. प्रत्यक्षात मात्र महापालिका निवडणुकीत भाजपने पैशाचा पाऊस पाडल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 
बातम्या आणखी आहेत...