आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cousins Uddhav Thackeray And Raj Thackeray Come Together On The Death Anniversary Of Balasaheb Thackeray

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर उद्धव-राज एकत्र, राजकीय मनोमीलनाचे मिळाले संकेत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतिदिन आहे. हजारो शिवसैनिकांसह अनेक नेत्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली व श्रद्धांजली अर्पण केली. याच स्मृतिदिनाच्या निमित्ताने उद्धव व राज यांची आज दुपारी भेट झाली व पुन्हा एकदा ते दोघे एकत्र येण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
आज दुपारी दीडच्या सुमारास राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी राज यांच्यासमवेत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते. राज यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी हस्तांदोलन केले. स्मृतिस्थळी सकाळपासूनच हजर असलेल्या उद्धव यांची राज यांनी भेट घेतली. त्यावेळी हे दोघे एकमेंकाच्या शेजारी बसले होते व राज यांनी उद्धव यांच्या खांदयावर हात ठेवला होता.
या दोघांच्या देहबोलीतून स्पष्टपणे दिसून येत होते की, या दोन्ही बंधूंमध्ये आता कोणताही दुरावा नाही तसेच हे दोघे राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ शकतात. दरम्यान, या भेटीबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना छेडले असता ते म्हणाले, आज आमच्या सर्वांसाठी दु:खाचा क्षण आहे. तरीही यातून काही आनंदाची वार्ता आली तर महाराष्ट्राचे व मराठी माणसाचेच भले होईल. नांदगावकर यांनी बोलण्यातून राज आणि उद्धव ठाकरे काही दिवसातच एकाच राजकीय मंचावर दिसतील असे संकेत दिले.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. राज यांचा लोकसभेपाठोपाठ विधानसभेत दारूण पराभव झाला. दुसरीकडे, भाजपने शिवसेनेचा लोकसभेला वापर करून घेतला तर विधानसभेला लाथाडले व सत्ता ताब्यात घेतली. दरम्यान, भाजपने शिवसेनेसोबत ज्या पद्धतीने दगाफटका केला ते पाहता उद्धव यांच्याबाजूने संपूर्ण राज्यात सहानुभूती आहे. राज यांनी मोदी व भाजपवर हल्लाबोल केल्याने शिवसेना व मनसेच्या पाठीराख्यातील अंतर झपाट्याने कमी होत गेले. आता भाजपने निकालानंतर शिवसेनेची पुन्हा कोंडी केली आहे. त्यामुळे राज-उद्धव एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत होते.
राज आणि उद्धव यांच्यात पक्षातील दुस-या फळीतील नेत्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु असल्याची चर्चा आहे. भाजपने सेनेला सत्तेत घेतले नसल्याने मुंबई, ठाणे महापालिकेत शिवसेना व मनसे एकत्र येतील व भाजपला सत्तेपासून दूर करतील असे बोलले जात आहे.
आज शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनीही राज यांचे आदराने स्वागत करीत एकत्र येण्याचे संकेत दिले. उद्धव यांच्यासह खासदार संजय राऊत, अनिल देसाई, निलम गो-हे, मिलिंद नार्वेकर यांचा राज यांच्याशी संवाद पाहता शिवसेना व मनसेत आता कोणतेही मतभेद राहिले नसल्याचे दिसून येत होते. राज ठाकरे यांना अनिल देसाई यांनी स्मृतिस्थळी आणले. त्यानंतर स्मृतिस्थळावर खास पुण्याहून मागविण्यात आलेली फुलांची रांगोळीबाबत राज यांनी माहिती घेतली. सेनेच्या नेत्यांनी त्याबाबत माहिती दिली व राज उद्धव यांच्याकडे गेले. उद्धव यांनी राजचे स्वागत करीत आपल्या शेजारची खुर्ची बसायला दिली. संजय राऊत त्यांच्यासमवेत होते.
यावेळी दोघा बंधूंत सुमारे 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. यावेळी सर्वांचीच देहबोली प्रचंड सकारात्मक होती व कोणताही दुरावा जाणवत नव्हता. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे आज सकाळीच पुण्याकडे दौ-यावर निघणार होते. मात्र, आपला नियोजित वेळ पुढे ढकलत शिवाजी पार्कवर हजेरी लावली. गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी स्मृतिस्थळावर हजेरी लावली नव्हती हे विशेष. मात्र, गेल्या 7-8 महिन्यांपासून राज्यात घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे राजकीयदृष्ट्या दुरावलेले हे दोघे बंधू पुन्हा मनोमीलनाचे संकेत देऊ लागले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, राज-उद्धव यांच्या मनोमिलनाचे फोटो...