आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Darda News In Marathi, Maharashtra, Politics

मध्यान्ह भोजनासाठी मध्यवर्ती किचन; राजेंद्र दर्डांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली असून लवकरच अशी स्वयंपाकघरे सुरू करण्यात येतील, अशी माहिती शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानसभेत दिली.

पाचोरा तालुक्यात मध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात येत असल्याचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे साहेबराव पाटील यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना निकृष्ट दजाचे धान्य पुरवण्यात आले नसून याबाबत कसलीही चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. या प्रश्नाच्या अनुषंगाने मध्यवर्ती स्वयंपाकघरे सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेवणाचे टेस्टिंग करण्याचे काम मुख्याध्यापकांना न देता समिती स्थापन करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या समित्या लवकरच स्थापन करू, असे आश्वासन दर्डा दिले. शहरी भागात पाच हजार मुलांसाठी एक स्वयंपाकघर, तर ग्रामीण भागात 25 हजार मुलांसाठी एक स्वयंपाकघर सुरू करण्यात येणार आहे.

या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मी राजस्थान, औरंगाबाद येथील मध्यवर्ती स्वयंपाकघरे पाहिली आहेत. अत्यंत अधुनिक यंत्रसामुग्री तेथे वापरण्यात आलेली आहे. चार तालुक्यांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू करण्याची तयारीही अध्यक्षांनी दर्शवली. यासाठी देशातील व औरंगाबाद येथील सेंट्रल किचन पाहिली असून राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार वागण्याऐवजी स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. निविदा न मागवता दोन महिन्यात योजना सुरू करावी, असे निर्देश वळसे पाटील यांनी दिले. अधिवेशन संपल्यानंतर सदस्यांना घेऊन शिक्षण मंत्र्यांनी औरंगाबाद वा राजस्थानमधील मध्यवर्ती स्वयंपाकघर पाहाण्यास घेऊन जावे असेही सुचवले.

शिक्षणमंत्र्यांनी यावर हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याचे सांगितले. उन्हाळी सट्टी असल्याने सध्या कामकाज बंद आहे. परंतु कामकाज सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन दर्डा यांनी दिले.