आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Darda News In Marathi, School Education Minister, Divya Marathi

शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांविरोधात कॉंग्रेस इच्‍छुकांनी वाचला तक्रारींचा पाढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराड किंवा वाई मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा ठरावच सातारा जिल्हा कॉँग्रेस समितीने केला असून जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी मंगळवारी राज्य निवड समितीसमोर तशी आग्रही मागणी केली. तर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जागी भोकर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाच उभे करावे, अशी आग्रही मागणीही नांदेडच्या पदाधिका-यांनी केली. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात पक्षातील तीन इच्छुकांनी तक्रारींचा पाढा वाचला.

कॉँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या रविवारपासून मुलाखती सुरू आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल 500 जण इच्छुक असून मंगळवारी त्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. या दोन्ही विभोगांतील 13 जिल्ह्यांमधील 53 मतदारसंघांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे विद्यमान आमदार असून यंदाही त्यांचा उमेदवारीवर दावा आहे. त्यांच्याशिवाय युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अन्वर शेरखान, अहमद हुसेन चाऊस आणि जी. एस. ए. अन्सारी यांंनी मंगळवारी मुलाखती दिल्या. या तिघांनी दर्डांविरोधात तक्रारींचा पाढा निवड समितीसमोर वाचला. शेरखान यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दर्डांवर अनेक आरोप केले. सांप्रदायिकतेची भीती घालून आजपर्यंत दर्डांनी मते मिळवली. त्यांच्याच त्रासाला कंटाळून अनेकांनी आजवर पक्ष सोडल्याचा आरोपही केला. औरंगाबादेतील पक्षाच्या स्थितीबद्दल ते म्हणाले की ‘अब काँग्रेस की शाम है, और यदी यही आलम रहा तो सुबह होने की कोई गुंजाईश नही.’
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर चव्हाण, अमित देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांसाठी मुलाखती असल्याने मुख्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.

प्रणिती शिंदे यांच्यासमोर सोलापुरात अडचणी वाढल्या
सोलापूर मध्य मतदारसंघाच्या विद्यमान आमदार व सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या विरोधात सोलापूरचे माजी महापौर यू.एन. बेरिया आणि तौफिक शेख यांनीही अर्ज दाखल केला आहे. खरी चिंता मात्र वेगळीच आहे. शिंदेंचे अतिशय निष्ठावंत समजले जाणारे विष्णुपंत अण्णा कोठे यांचे पुत्र आणि माजी महापौर महेश कोठेंनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात येणार आहे. तसेच कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडाम हेसुद्धा रिंगणात असल्याने पक्षांतर्गत विरोधासह पक्षाबाहेरूनही मोठे आव्हान प्रणिती शिंदेंसमोर असेल.

अमिता चव्हाणांची दांडी
भोकर मतदारसंघातून अमिता चव्हाण यांच्यासह आणखी दोघांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी मुलाखतीला अमिता चव्हाण गैरहजर होत्या. मात्र, भोकरमधून अमिता चव्हाण यांनाच उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी आम्ही अगोदरच पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले. तसेच मतदारसंघात अनेक विकासकामांच्या उद्घाटनाचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मुलाखतीसाठी अमिता गैरहजर राहिल्या असून त्याबाबत पक्षाकडून परवानगी घेतल्याचा खुलासाही राजूरकर यांनी केला.

मुख्यमंत्रीही गैरहजर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या कराड दक्षिण आणि वाई या दोन मतदारसंघांपैकी एका ठिकाणाहून उमेदवारी द्यावी, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मुलाखतींच्या वेळी मुख्यमंत्री मात्र अनुपस्थित होते. दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपासून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेतल्या जातील. तसेच दुपारी 1 वाजेपासून कोकणातील ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासह मुंबईतील 36 मतदारसंघातील जिल्हानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत.

प्रचार समितीची शुक्रवारी बैठक
काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता टिळक भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी प्रचार समितीचे अध्यक्ष, उद्योगमंत्री नारायण राणे तसेच समन्वयक आमदार मुझफ्फर हुसेन व बसवराज पाटील यांच्यात चर्चा झाली. ही समिती विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या प्रचार मोहिमेची रणनीती व नियोजनाची जबाबदारी सांभाळणार आहे.