आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदारांनी उभारले राज्यात बंधार्‍यांचे सांगाडेः जलतज्‍ज्ञ राजेंद्रसिंह यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘महाराष्ट्रातील बंधार्‍यांची कामे सर्वस्वी अभियंत्यांच्या हाती सोपवली. त्याचा फायदा कंत्राटदारांनी उठवला. फायद्यासाठी त्यांनी बंधार्‍यांचे हवे तसे सांगाडे उभे केले. त्यामुळे राज्यातील बहुतेक बंधारे पाणी अडवण्यास कुचकामी ठरले आहेत,’ अशा शब्दात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी बुधवारी शासनाचे चांगलेच वाभाडे काढले.

‘पाणी समस्या व व्यवस्थापन’ या विषयावर बुधवारी विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी राजेंद्रसिंह म्हणाले की, पाणी समस्या सोडवण्यासाठी भरमसाट पैसे खर्च करू नका. त्यापेक्षा पाणी चळवळीत समाजाचा सहभाग वाढवा. निव्वळ योजना राबवून पाण्याची समस्या सुटणार नाही. ही समस्या सोडवणे एकट्या राजकारण्यांची जबाबदारी नाही, त्यासाठी समाजाने पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी
व्यक्त केली. धरणांचे राज्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात, याबद्दल राजेंद्रसिंह यांनी खेद व्यक्त केला. पाणी वापरात शिस्त आणून पावसावर आधारित पीक पद्धती राबवायला हवी. महाराष्ट्राला नदी धोरणाची नितांत आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, उपसभापती वसंत डावखरे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि प्रधान सचिव अनंत कळसे उपस्थित होते.

शिरपूर पॅटर्न थोतांडच : देसरडा
औरंगाबाद येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. एच. एम. देसरडा उभे राहिले आणि तावातावाने वाद घालू लागले. ‘शिरपूर पॅटर्न थोतांड असून, हा प्रयोग केवळ तापी खोर्‍यात शक्य आहे,’ असा दावा त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी हस्तक्षेप करत देसरडा यांना खाली बसवले.

कोल्हापुरी बंधारे कालबाह्य

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आजच्या परिस्थितीत कालबाह्य झाले आहेत. सांडवा नसलेले खोल बंधारे बांधले तरच राज्यात भूजलपातळी वाढेल, असे सांगून रोहयोतून बंधारे बांधल्यामुळे त्याची गुणवत्ता ढासळल्याचा मुद्दा शिरपूर पॅटर्नचे जनक डॉ. सुरेश खानापूरकर यांनी मांडला. तालुक्यातील पाणी तालुक्यातच राहिले पाहिजे, ही शिरपूर पॅटर्नमागची संकल्पना असल्याचे शिरपूरचे आमदार अमरीश पटेल म्हणाले. उत्तरेत मोठी धरणे बांधून कालव्याने सिंचनाची सोय केली जाते. ती पद्धत महाराष्ट्रात लागू होणार नाही. राज्याला उपसा सिंचनाशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.