आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्नांच्या ‘आशीर्वाद’ची 90 कोटींना विक्री; अनिता अडवाणींचा विरोध, कोर्टात जाणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा मुंबईतील ‘आशीर्वाद’ बंगला एका उद्योगपतीने 90 कोटी रुपयांना विकत घेतल्याची चर्चा आहे. मात्र, या विक्रीला खन्ना यांची मैत्रीण अनिता अडवाणी यांनी विरोध दर्शवला आहे. कार्टर रोड येथील समुद्रकिनारी असलेला खन्ना यांचा हा बंगला ऑलकार्गा लॉजिस्टिक्सचे कार्यकारी संचालक शशी किरण शेट्टी यांनी विकत घेतला आहे.
या बंगल्याच्या विक्रीतून खन्ना कुटुंबीयांना 90 कोटी रुपये मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत शेट्टी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणाचीही हरकत असू नये म्हणून बंगल्याबाबत वृत्तपत्रात 15 दिवसांची नोटीस प्रकाशित करण्यात आली आहे.

शेट्टी हे मागील काही वर्षांपासून मुंबईत बंगल्याच्या शोधात होते. यासाठी त्यांनी 100 कोटींची रक्कम राखून ठेवली होती. त्यांनी वरळी येथील बांधकाम सुरू असलेल्या रॉयल पॅलेस या गगनचुंबी इमारतीत 40 कोटींचा फ्लॅट बुक केला होता. मात्र, महापालिकेने घेतलेल्या हरकतीमुळे हे बांधकाम अर्धवट थांबले असून प्रकरण न्याप्रविष्ट आहे. त्यामुळे शेट्टी मुंबई शहरात चांगल्या घराच्या शोधात होते. खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्यात काही प्रमाणात नूतनीकरण करून त्यांनी येथेच राहण्याचे नक्की केल्याचे समजते.

आशीर्वादच्या खरेदी-विक्रीची कुणकुण लागल्याने राजेश खन्ना यांची मैत्रीण अनिता अडवाणी या विक्रीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या बंगल्याचे संग्रहालय बनवावे अशी त्यांची इच्छा आहे. राजेश खन्ना यांच्या चाहत्यांचेही हेच मत असल्याचे अनिता यांनी सांगितले. अनिता यांनी यापूर्वीच खन्ना यांच्या संपत्तीबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना बंगल्याचा खरेदी-विक्री व्यवहार कसा केला, असा प्रश्नही अडवाणी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राजेश खन्ना यांच्या ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली वारसदार आहेत. तसेच खन्ना यांनीही एका मुलाखतीत माझ्या संपत्तीत निर्णय दोघी घेऊ शकतील, असे म्हटले होते. त्यामुळे आता खन्ना व अडवाणी यांच्यातील वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे.