आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजीव शुक्लांची जमीन अखेर सरकारकडे जमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजकीय हितसंबंधाचा फायदा घेत व पदाचा गैरवापर करत केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी अंधेरी येथे 100 कोटींची जमीन कवडीमोलाने विकत घेतली होती. मात्र, त्याविरोधात आंदोलन सुरू होताच शुक्ला यांनी अखेर मंगळवारी ही जमीन राज्य सरकारकडे परत केली.
राज्य सरकारने 2007-08 मध्ये अंधेरी आंबोली येथील दोन हजार 821 चौरस फुटांची जागा राजीव शुक्ला यांच्या बीएजी संस्थेला केवळ 98 हजार 739 रुपयांत दिली. एवढेच नव्हे, तर या जमिनीच्या बाजूची शाळेसाठी राखीव असलेली तीन हजार 534 चौरस फुटांची जमीनही आरक्षण उठवून शुक्ला यांना विकत घेण्यास मदत केली. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या जमिनीचा मुद्दा उचलून धरला होता.
या गैरव्यवहाराच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जमीन परत देत असल्याचे सांगितले. मात्र, या जमिनीच्या विकासापोटी खर्च करण्यात आलेले दोन कोटी रुपये परत देण्याची मागणीही केली; परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडे असे पत्रच आले नसल्याचे दिसून आले होते. या जमिनीबाबतची सगळी कागदपत्रे मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचेही सांगण्यात येत होते.
महसूल सूत्रांनी सांगितले, शुक्ला यांनी जमीन परत करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी आम्हाला पत्र पाठवून जमीन ताब्यात घेण्यास सांगितले. उपनगर उपजिल्हाधिकारी पाटील यांनी मंगळवारी ही जमीन ताब्यात घेतली असून तेथे जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात जमीन असा बोर्ड लावलेला आहे.
ही जमीन सरकारी मालकीची व्हावी याबाबतची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. शुक्ला यांनी जमिनीच्या विकासासाठी खर्च केलेल्या दोन कोटी रुपयांच्या मागणीबाबत काय करता येईल, याचा महसूल विभाग विचार करत आहे.
दबावाला घाबरत नाही
जमिनीचा मुद्दा उचलल्यानंतर माझ्यावर प्रचंड दबाव आला; परंतु मी हार मानली नाही. सरकारची जमीन परत मिळवून दिलीच. किरीट सोमय्या, भाजप नेते