आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर नाराज राजू शेट्टी ‘मातोश्री’वर; कर्जमाफी आणि समृद्धी महामार्गासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी दीड तास चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अापल्याच सरकारविराेधात अाक्रमक अांदाेलन सुरू केले अाहे. याच सरकारमधील दुसरा मित्रपक्ष शिवसेनाही वेळाेवेळी याच मुद्द्यावर फडणवीस सरकारला घेरण्याची एकही संधी साेडत नाही. भाजपच्या विराेधात असलेल्या या दाेन्ही पक्षांच्या प्रमुखांची बुधवारी सुमारे दीड तास बैठक झाली. राजू शेट्टी यांनी ‘माताेश्री’वर जाऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. भाजपचे सर्व प्रमुख नेते पुण्यात असताना या उभय नेत्यांमधील भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले अाहे.    
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी आणि समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्या जात असल्याबद्दल खासदार राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गप्रकरणी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन शेट्टींना दिले. नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.  मात्र, जमीन संपादनावरून शेतकरी आंदोलन करत असल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेनेही अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरले हाेते. तुरीच्या प्रश्नावरही या पक्षाचे मंत्री अाक्रमक अाहेत. त्यातच या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी ठाकरेंची घेतलेली भेट राज्यात चर्चेचा विषय बनला अाहे. शेतकरी कर्जमाफी व समृद्धी महामार्गावरून शिवसेना व स्वाभिमानी संघटना एकत्र येऊन फडणवीस सरकारला जाब विचारण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
 
यापूर्वी तीनदा गाठीभेटी  
सन २०१२ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनात एका फौजदाराचा मृत्यू झाला होता. तत्कालीन आघाडी सरकारने राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तेव्हा राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मदत मागितली होती. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा खासदार शेट्टी यांना अटक झाल्यास महायुती रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला होता.   
 
२०१३ मध्ये राज्यातील सहकारी चळवळीबाबत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली होती. २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी महायुतीच्या जागा वाटपासाठीही राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
 
बातम्या आणखी आहेत...