आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वाभिमानी’ने काढलेल्या राज्यमंत्री सदा खोतांचं काय करता? राजू शेट्टींचा CMना सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे / मुंबई - ‘सदाशिव खोत यांना संघटनेतून काढून टाकले आहे. ते आता आमचे प्रतिनिधी नाहीत. बोला, काय करता त्यांचं,’ या आशयाचा खलिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आणि भाजपच्या मुंबई कार्यालयात गुरुवारी पोहोचवला. विशेष म्हणजे ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: हे खलिते दोन्ही ठिकाणी नेऊन पोहोचवले.  
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून शेट्टी यांनी शिफारस केल्यानंतरच खोत यांना भाजपची आमदारकी आणि राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. आता खोत यांचा संघटनेशी काही संबंध उरला नसल्याने त्यांच्याबाबत कोणता निर्णय घेणार मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी भूमिका खासदार शेट्टी यांनी घेतली आहे. त्यासाठी गुरुवारी शेट्टींनी मुंबई गाठली. मात्र, मुख्यमंत्री भाजपच्या कार्यकारिणीसाठी बोरिवली येथे गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शेट्टी यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शेट्टींनी मुख्यमंत्र्यांसाठी लेखी पत्र ‘वर्षा’वर ठेवले. त्यानंतर शेट्टींनी मंत्रालयाजवळच्या भाजप प्रदेश कार्यालयात जाऊन तिथेही एक पत्र ठेवले.  
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अॅड. योगेश पांडे यांनी सांगितले, ‘संघटनेतून काढून टाकलेली व्यक्ती संघटनेचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, हा निरोप मुख्यमंत्र्यांना द्यायचा होता. तो लेखी स्वरूपात देण्यात आला. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल.’ दरम्यान, राजू शेट्टी यांनीच भाजप सरकारसोबत राहायचे की नाही, यासंदर्भातला निर्णय संघटनेच्या येत्या कार्यकारिणी बैठकीत घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेट्टी हेच जर भाजपसोबत राहणार नसतील तर खोत यांच्याबद्दलचा निर्णय घेण्याचे बंधन भाजपवर राहील का? या प्रश्नावर पांडे म्हणाले, की भाजपसोबत राहण्याचा अथवा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय अद्याप संघटनेत झालेला नाही.   दरम्यान, भाजपच्या बैठकीमुळे मुख्यमंत्री भेटू शकणार नाहीत, याची पूर्वकल्पना शेट्टी यांना नव्हती का? की मुख्यमंत्र्यांशी चर्चेचा प्रसंग न ओढवताही त्यांच्यापर्यंत संघटनेची भूमिका मांडण्याचा प्रयत्न शेट्टींनी जाणूनबुजून केला, अशी शंका उपस्थित केली जात अाहे.

मंत्रिपदावर टांगती तलवार
भाजपमध्ये न जाता स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन करण्याचा इरादा सदाशिव खोत यांनी व्यक्त केला आहे.  दसऱ्याला नव्या संघटनेची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शेट्टी आणि मुख्यमंत्री यांच्यात तह झाल्यास खोत यांच्या मंत्रिपद तसेच आमदारकी धोक्यात येऊ शकते. या जर-तरच्या शक्यतांमध्ये खोत यांची राजकीय कारकीर्द सध्या हेलकावत आहे. खोत यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यास सरकारला राजी करण्यासाठी राजू शेट्टी किती झगडतात, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

शेट्टी निर्णय घेणार तरी कधी?
भाजप सरकारविरोधात राजू शेट्टी सातत्याने भूमिका घेत आहेत. मोदी यांच्याविरोधात शेतकरी संघटनांची राष्ट्रीय आघाडी उभी करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. भाजपची संगत साेडण्याचा इशाराही त्यांनी अनेकदा दिलाय. पण त्यासाठी शेट्टींना अद्याप सापडलेला नाही. संघटनेच्या येत्या कार्यकारिणीत याबद्दलचा निर्णय घेण्याची नवी तारीख त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर खोत यांच्यासंदर्भातले पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्यामुळे शेट्टी पुन्हा सरकारशी जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...