आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित गेट : राकेश मारियांचा दावा फोल, अडचणींत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले ललित मोदी यांच्या भेटीमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेले मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जुलै २०१४ मध्ये लंडनमध्ये मोदींची भेट घेतल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिली होती, असा दावा मारिया यांनी केला होता. मात्र तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी फेटाळून लावल्याने त्यांच्या दाव्यातील हवाच गुल झाली आहे.

ललित मोदींच्या भेटीचा गौप्यस्फोट स्वत: मारिया यांनीच केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून खुलासा मागितला होता. मारिया यांनी सोमवारी विस्तृत अहवाल सादर केला. मारिया यांनी त्यांचे म्हणणे सादर केले आहे, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी सांगितले. मात्र त्यांनी तपशील देण्यास नकार दिला. मारिया यांनी मोदींच्या भेटीची माहिती दिली नव्हती, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि राजन यांनी सांगितल्यानंतर मारिया उघडे पडले. मारिया आपणास अनेक वेळा तोंडी माहिती देत असत. मारिया मोदींना भेटले होते, असे आर. आर. पाटील यांनीही मला सांगितले नाही, असे चव्हाण म्हणाले. मोदी- मारिया यांच्या भेटीची माहिती मला माध्यमातूनच मिळाली, असे राजन यांनी म्हटले आहे.

आयपीएलच्या घोटाळेबाजाशी भेट अंगलट
राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना जुलै २०१४ मध्ये मारिया यांनी लंडनमध्ये ललित मोदी यांची भेट घेतली होती. मारियांची मोदींसोबतची छायाचित्रे प्रकाशित झाल्याने नवा वाद निर्माण झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मारियांकडून स्पष्टीकरण मागवावे लागले.

मारियांनी दिला ८ पानी खुलासा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राकेश मारिया यांनी सोमवारी सरकारकडे आठ पानी खुलासा सादर केला. त्याचा तपशील असा :
- अंडरवर्ल्डकडून मोदींना मारण्याचा कट रचण्यात आला होता आणि तो मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ही भेट होती.
- या भेटीची तत्कालीन गृहमंत्र्यांना माहिती होती. ही भेट गुपचूप नव्हती.मोदींना मुंबईत तक्रार देण्याचा सल्ला दिला होता, असे खुलाशात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
- गेल्या वर्षी लंडनमध्ये ललित मोदी यांच्या वकिलांच्या आग्रहावरून आपण त्यांना भेटलो होतो.लंडनमध्ये अंडरवर्ल्डकडून आपणाला धोका आहे, असे मोदी म्हणाल्याचा खुलासा मारिया यांनी केला होता. ही माहिती तत्कालीन सरकारला दिल्याची पुस्तीही त्यांनी जोडली होती.
- पोलिस अधिकार्‍यांच्या परदेश दौर्‍यांना गृहमंत्र्यांच्या पातळीवरच मंजुरी दिली जाते. त्यामुळे मारिया यांच्या लंडन दौर्‍याची आपणाला काहीही माहिती नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

सरकार व भाजप राजेंच्या पाठीशी : गडकरी
ललित मोदी प्रकरणात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसंुधराराजे शिंदे यांनी काहीही चुकीचे केले नाही. भाजप व केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. वसंुधराराजेंचे खासदार पुत्र दुष्यंत आणि मोदी यांच्यात झालेली आर्थिक देवाण-घेवाण बेकायदेशीर नसल्याचे गडकरी म्हणाले. काँग्रेसने मात्र केंद्र सरकार दुष्यंत यांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे.