आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारिया यांच्या बदलीमागे मोदी सरकार - राष्ट्रवादी काँग्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एका चॅनेलमध्ये मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून मोठी गुंतवण्यात करण्यात आली होती. राकेश मारिया यांच्यामुळे या बाबी उघड झाल्या असत्या. म्हणून केंद्र सरकारवर दबाव आणून गुंतवणूकदारांनी मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी करण्यास फडणवीस सरकारला भाग पडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी केला.

एका चॅनेलची स्थापना इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी याने केली होती. त्यात युएस, दुबई मधील अनेक बड्या मंडळींनी पाचशे कोटीपेक्षा अधिक रक्कम गुंतवली होती. ही रक्कम मनी लाँड्रिंग म्हणजे बेकायदा पद्धतीने गुंतवण्यात आली होती. मुंबई पाेलिस आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्याकांडाच्या तपासात जातीने लक्ष घातले होते. गुंतवणूकदारांना आपले िबंग फुटण्याची भीती होती. म्हणून या मंडळींनी मोदी सरकारकडून मारिया यांची बदली करण्यास फडणवीस सरकारला भाग पाडले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

मारिया ज्या गतीने बोरा हत्याकांडाचा तपास करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व पसंत नव्हते. फडणवीस यांनी आठ दिवसांपूर्वी टि्वट करून मुंबईत इतरही प्रश्न आहेत, असा इशारा मारिया यांना दिला होता. परंतु मारिया यांनी आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास चालूच ठेवला होता. त्यामुळेच फडणवीस यांना त्यांची गच्छंती करण्यावाचून मार्ग उरला नव्हता, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

मारिया यांना ३० सप्टेंबर रोजी बढती मिळणार होती. परंतु तब्बल २२ दिवस अगोदर त्यांच्या बढतीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केली. निर्णय घेऊन मुख्यमंत्री जपानच्या दौर्‍यावर गेले आहेत. परंतु मारिया यांच्या अकाली बदलीचा जाब त्यांना विचारला जाईल, असा इशाराही मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला.

प्रसिद्धीसाठी टिका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील दुष्काळावरुन पवार यांच्यावर तोंडसुख घेत आहेत, असा प्रतिआरोप करत गोदावरीचे अधिक पाणी उचलून याच विखेंनी मराठवाड्याचे पाणी पळवल्याचे तटकरे या वेळी म्हणाले.

राज्यभर आंदोलन
१४ आणि १५ सप्टेंबर रोजी राज्यातील ३५ जिल्ह्यांत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात मात्र १६ सप्टेंबरला आंदोलन होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वेळी बोलताना दिली.