आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित गेट : सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंमुळे मारियांना ‘क्लीन चिट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलचे माजी आयुक्त आणि फरार आरोपी ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेऊन वादग्रस्त ठरलेले मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील बदली वा निलंबनाचे संकट तूर्त तरी टळले आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही ललित माेदींना मदत केल्याचा आराेप हाेत आहे. या पार्श्वभूमीवर मारियांवर कारवाई केल्यास भाजपच्या या दाेन नेत्यांवरही कारवाईसाठी दबाव वाढेल, ही शक्यता लक्षात घेऊन मारियांना क्लीन चिट देण्यात आल्याचे वृत्त आहे.

ललित यांची भेट घेतल्याची कबुली खुद्द मारियांनीच दिली हाेती. मात्र, या भेटीबाबत आपल्याला काहीही कल्पना देण्यात आली नव्हती, असे वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मारियांची अडचण वाढवली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या आदेशानुसार मारियांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्याकडे ८ पानी स्पष्टीकरण दिले हाेते. बक्षींनी ताे खुलासा मंगळवारी फडणविसांना सादर केला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांत फडणविसांनी टि्वटरद्वारे मारियांचा खुलासा समाधानकारक असल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली.

सविस्तर माहिती घेण्याचे आदेश
‘मारियांचा खुलासा सकृतदर्शनी समाधानकारक वाटतो. मात्र, त्यांनी दिलेल्या काही मुद्द्यांबद्दल विस्तृत माहिती हवी आहे. ललित माेदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याचे त्यांनी वरिष्ठांना कळवले की नाही, याबाबत मात्र समाधनाकारक माहिती त्यांच्या खुलाशात नाही. ती घेण्याचे आदेश बक्षी यांना दिले आहेत.’ - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सावध पवित्रा
संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात सुरू हाेत आहे. तिथे ललित मोदी प्रकरण गाजणार आहे. विरोधकांतर्फे स्वराज आणि राजे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला जाणार आहे. अशा वेळेस केवळ राज्यात मारियांवर कारवाई केली, तर मग थेट ललित यांना मदत करणार्‍या स्वराज आणि राजेंवर का नाही, या अवघड प्रश्नाचे उत्तर देणे कठीण होईल. त्यामुळे मारियांची या वादातून सुखरूप सुटका झाली आहे.