मुंबई - आपले नाव आणि चेहरा कायम चर्चेत राहावा, यासाठी धडपडणारी बॉलीवूड स्टार
राखी सावंतने आपली औटघटकेची राष्ट्रीय आम पार्टी मोडीत काढून शनिवारी रामदास आठवले यांच्या रिपाइंत प्रवेश केला. या वेळी राखीने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे सांगत प्रवेशाचा अंक रंगवला.
एमआयजी क्लब येथे एका कार्यक्रमात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राखीचे स्वागत केले. राखीची रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी राखी म्हणाली, राज ठाकरे जिथून कुठून उभे राहत असतील तिथे मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहे. आठवलेंनी परवानगी दिली तर माझा आणि राज ठाकरेंचा मुकाबला रंगतदार होईल.
राखी भविष्यात महाराष्ट्राची मुख्यमंत्री होऊ शकते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर उद्धव यांचे बोल खरे करून दाखवण्याची माझ्यात हिंमत आहे, असे राखी म्हणाली.
लोकसभेत गाजावाजा करून स्थापन केलेल्या राष्ट्रीय आम पार्टीचे काय झाले, असे विचारले असता राखी म्हणाली, पक्ष स्थापना व प्रचारासाठी मला फक्त 12 दिवस मिळाले. तरीही मला लोकांनी अडीच हजार मते दिली, हे काही कमी नाही. आता मी त्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. रिपाइंच्या महिला आघाडीची जबाबदारी आल्यानंतर ही सिमेमात काम करणार का, यावर राखी लगेच उत्तरली, मी बॉलीवूड सोडणार नाही.
स्टार प्रचारक मिळाला : आठवले
राखीच्या रूपात रिपाइंला स्टार प्रचारक मिळाला आहे. माझ्याप्रमाणे ती पोलिस कुटुंबातील आहे. सामान्यांच्या वेदना तिला कळतात, असे रामदास आठवले म्हणाले.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)