आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Kadam kshitij Thakur Suspend Order Will Back In Monsoon Session

ठाकूर-कदमांचे निलंबन पावसाळी अधिवेशनात मागे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सहायक पोलीस निरीक्षक वसंत सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या क्षितिज ठाकूर व राम कदम या आमदारांचे निलंबन येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात, तर उर्वरित तिघांचे तत्काळ मागे घेण्याची शिफारस आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली आहे. त्याबाबतचा अहवाल गुरुवारी विधानसभेमध्ये ठेवण्यात आला.


सूर्यवंशी यांनी ठाकूर यांच्यासमवेत केलेल्या वर्तनाबाबत गंभीर आक्षेप घेत त्यांची विभागीय चौकशी करावी व त्यांच्याविरोधात विनाविलंब कारवाई करावी, अशी शिफारस या समितीने केली आहे. तसेच, सरकारी अधिका- यांनी लोकनियुक्त प्रतिनिधींशी कसे वागावे, याची नियमावली ठरवण्यात आली आहे. तिचे पालन व्हावे, यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर विशेष कक्षाची स्थापना करावी. हा कक्ष थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना उत्तरदायी असेल, अशीही महत्त्वपूर्ण शिफारस समितीने केली आहे. ठाकूर यांच्या मारहाणीबाबत बाहेर जितके दाखवण्यात आले, तितकी ही मारहाण गंभीर नव्हती. या जखमा किरकोळ असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिका- यांनी दिल्याकडेही या समितीने आपल्या अहवालात लक्ष वेधले आहे. विधान भवनाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करण्याची शिफारसही समितीने केली आहे. या समितीने सात बैठका घेतल्या व 17 व्यक्तींचे साक्षी-पुरावे अभ्यासले.

काय आहे प्रकरण?
18 मार्च रोजी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर गाडी वेगाने चालवण्यावरून सूर्यवंशी व बहुजन विकास आघाडीचे आमदार ठाकूर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या घटनेची माहिती घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना दुस- या दिवशी विधान भवनात पाचारण केले असता ठाकूर व कदम यांनी त्यांना मारहाण केली. राजन साळवी, प्रदीप जैस्वाल व जयकुमार रावल यांच्यावरही कृत्यात सामील असल्याचा आरोप होता. त्याबद्दलही पाचही जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.