आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित, उर्मट भाषेचा वापर केल्‍यामुळे कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील पीएसआय मारहाणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले मनसेचे आमदार राम कदम व क्षितीज ठाकूर यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोघांची तुरुंगातून सुटका करण्‍यात आली आहे. त्‍यानंतर आता पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्‍यात आले आहे. आमदारांसोबत उर्मट भाषेत संभाषण केल्‍यामुळे कारवाई करण्‍यात आल्‍याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

दरम्‍यान, राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावरुन जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या दोघांनी दर बुधवारी क्राइम ब्रॅंचमध्ये हजेरी लावावी, असे आदेश दोघांना देण्यात आले आहेत. दरम्यान, या दोघांची चौकशी पूर्ण झाली असून, आणखी पोलिस किंवा न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या दोन आमदारांनी एक रात्र पोलिस कोठडीत आणि दोन रात्री न्यायालयीन कोठडीत काढल्या.

अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह मनसेचे आमदार राम कदम, भाजपचे जयकुमार रावल यांनी मंगळवारी विधानभवनाच्या आवारातच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्यात या गोष्टीवरुन खूप रणकंदन झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर या प्रकरणात पाच आमदार निलंबित 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. यात बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे राम कदम, भाजपचे जयकुमार रावल, शिवसेनेचे राजन साळवी आणि अपक्ष प्रदीप जैस्वाल यांचा समावेश आहे. तसेच त्यानंतर ठाकूर आणि कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी पोलिस व न्यायालयीन कोठडीत केली होती. गेली तीन रात्र हे दोन्ही आमदार तुरुंगाची हवा खात होते. अखेर आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.