मुंबई - ‘जोपर्यंत अयोध्येत राम मंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत हिंदूंचा गमावलेला आत्मसन्मान परत मिळणार नाही. कुणा राज्यकर्त्यांना आवडो न आवडो किंवा सहकार्य करो न करो अयोध्येत राम मंदिर आम्ही बांधणारच,’ अशी घोषणा करत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी रविवारी भाजप सरकारलाच इशारा दिला.
मुंबईच्या बांद्रा कुर्ला मैदानावर आयोजित सुवर्ण महोत्सव हिंदू संमेलनात ते बोलत होते.
जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज (नाणीज पीठ), जयेंद्र सरस्वरती (शंकराचार्य, कांची कोमकोठी पीठ) आणि नरेंद्रनंदन महाराज (शंकराचार्य, सुमेरु पीठ), साध्वी सरस्वतीजी, बौद्ध महाथेरो राहुल बोधी, जैन मुनीश्री विनम्रसागरजी महाराज, माजी गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद, भास्करगिरी महाराज, इस्कॉनचे कमललोचनदास महाराज, गोव्याचे उद्योगपती अशोक चौगुले, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा पूर्णिमा अडवाणी, विहिंपचे संरक्षक अशोक सिंघल यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपला मदत करा
ताेगडीया म्हणाले की, ‘जगात शंभर करोड हिंदू आहेत. त्या सर्वांना सुरक्षितता देण्यास विहिंप कटिबद्ध आहे. तसेच गोहत्या होऊ न देणारे जागरूक हिंदू बना’ असे सांगत तोगडिया यांनी उपस्थित समुदायास जागृत हिंदू होण्याची शपथ दिली. धर्मांतर करण्यास विहिंपचा विरोध असून धर्मांतरबंदीचा कायदा करण्यास भाजपला इतर पक्षांनी मदत करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.
गाेमूत्रापासून शाम्पू, साबण
दूध न देणा-या गायी शेतकरी विकतात. त्या कत्तलखान्यात जातात. त्यामुळे अशा भाकड गायी वाचवण्यासाठी विहिंपने गोमूत्रापासून शाम्पू आणि साबण बनवण्यासाठी कारखाने उभारल्याची माहिती तोगडिया यांनी दिली. राज्यघटनेत जरी भारत हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले असले तरी भारत हे नि:संशय हिंदू राष्ट्र आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
विवाहाचे अधिकार आई-वडिलांना द्या
सज्ञान मुला-मुलींचे विवाहाचे अधिकार त्यांच्या माता-पित्यास द्यायला हवेत, तसा कायदा भारतात करण्याची गरज आहे. तसे केल्यास ‘लव्ह जिहाद’चा प्रश्नच उद्भवणार नाही. तसेच इंटरनेटवरील सर्व कामुक साहित्य हटवण्याची गरज आहे, असे मत जैन मुनीश्री वैभवरत्नजी महाराज यांनी व्यक्त केले.
नैतिकता हरवल्याने पाण्यासाठी भांडणे
भारतातील कायदे हिंदू धर्माच्या मुळावर येत आहेत. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हिंदूंना अडचणीत आणणारा आहे. विज्ञानाने प्रगती केली, पण
आपण नैतिकता गमावली. त्यामुळेच पाण्यावरुन दोन जिल्ह्यांत भांडणे होतात. आपण सोवळ्यात अडकून पडल्यामुळे धर्मांतरे वाढली, असे नरेंद्राचार्य महाराज म्हणाले.
‘मोदींनी आता मंदिराचा प्रश्न हाती घ्यावा’
भारतीय मुस्लिम वफादर नाहीत. मोदी सरकार मुस्लिमांना वफादारीचे सर्टिफिकेट देऊन राजकारण करत आहे. महात्मा गांधींनी नव्हे तर क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र केला. पाकिस्तानला संपवण्यासाठी हिंदूंनो जागो व्हा!’,
- साध्वी सरस्वती
मोदी चांगला माणूस आहे. त्यांनी सारा देश पादाक्रांत केला. आता राममंदिराचा प्रश्न हाती घ्यावा. मुस्लिम आणि हिंदू नेत्यांना एकत्र आणावे. तोडगा काढावा आणि मंदिर पुन्हा उभे करावे. मंदिराचे काम मोदींच्या हातूनच होऊ शकते.- शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, कांची कामकोठी पीठ