आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी एनडीएत यावे, रामदास आठवले यांनी दिला सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तिस-या आघाडीत जाणार नाहीत. मात्र, जर त्यांना काँग्रेसची साथ सोडायची असेल तर त्यांनी एनडीएत सामील व्हावे, असे मत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. महायुतीची जागावाटपाबाबतची पहिली बैठक यशस्वी झाली असून त्यात झालेल्या निर्णयाबाबत आम्ही संतुष्ट असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

आठवले म्हणाले, पवार यांना पंतप्रधान व्हायचे आहे. त्यासाठी ते विविध मार्ग तपासून पाहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिस-या आघाडीच्या बैठकीला त्यांचा प्रतिनिधी उपस्थित होता. तिसरी आघाडी आली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात. परंतु तिस-या आघाडीला बहुमत मिळणार नाही आणि पवार यांनाही ही बाब चांगलीच ठाऊक आहे.

दबावाचे राजकारण करण्याची त्यांची पद्धत असल्याने त्यांनी बैठकीला आपला प्रतिनिधी पाठवला असावा. मायावतीही पंतप्रधान होतील असे मला वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची तुलना बुद्ध आणि ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या उंचीबरोबर केली आहे. योग्यता ही उंचीवर अवलंबून नसते. मोदी आणि भाजपला पत्र पाठवून उंचीबाबतची जाहिरात बंद करण्याची विनंती आम्ही करणार आहोत.

युतीसोबत झालेल्या चर्चेने आम्ही संतुष्ट आहोत. आम्हाला लोकसभेच्या तीन जागा आणि राज्यसभेची एक जागा देण्याचे मान्य केले आहे. आमच्यात आता जागावाटपावरून कसलाही वाद नसून कोणत्या जागा सोडायच्या याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुलवर बोलणे योग्य नाही : राहुल गांधी चांगले पंतप्रधान होऊ शकतात का, यावर ते म्हणाले मी यूपीएमध्ये असताना राहुल यांना उपपंतप्रधान करा, त्यांना अनुभव येईल आणि ते पंतप्रधान म्हणून चांगले काम करू शकतील असे म्हटले होते. मात्र, आता ते पंतप्रधानच होणार नाहीत. त्यामुळे चांगले आणि वाईट याबाबत काहीही बोलणे योग्य नाही.


राज्याबाहेर स्वतंत्र लढणार
नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणून देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे चुकीचे आहे. आपला देश लोकशाहीप्रधान असून घटनेने सर्व धर्मांना योग्य स्थान देण्याचे सांगितले आहे. त्यांच्या या योजनेला आमचा विरोध आहे. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही राज्यात भाजपबरोबरच राहणार आहोत, तर महाराष्ट्राबाहेर आम्ही वेगवेगळेच लढणार आहोत. दिल्लीत आम्ही 18 जागांवर लढणार असून अन्य राज्यांतही उमेदवार उभे करणार आहोत.