आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब देत राहिले, नातू मात्र मागत राहिले, आठवले यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘आपल्यामिळकतीतून उभ्या केलेल्या संस्थांचे न्यास स्थापन करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अायुष्यभर कायम समाजाला देतच राहिले. मात्र, त्यांचे नातू प्रकाश, भीमराव आणि आनंदराज हे तिघे मात्र बाबासाहेबांच्या सर्व संस्थांमध्ये विश्वस्तपदासाठी कायम भांडत असून समाजाकडून केवळ मागत राहिले आहेत. म्हणूनच हे तिघे आंबेडकर बंधू समाजाच्या आदरास जराही पात्र नाहीत,’ अशी खरमरीत टीका रिपाइं अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद सामोपचाराने मिटवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘मुंबईतील आंबेडकर भवन पाडकामप्रकरणी आंबेडकर बंधू किंवा माजी माहिती अायुक्त रत्नाकर गायकवाड यापैकी मी कुणाच्याही बाजूचा नाही. मात्र, आंबेडकर भवनाची इमारत धोकादायक होती, ती पाडणे आवश्यक होते. ती इमारत उद‌्ध्वस्त केली नसून नवी इमारत बांधण्यासाठी ती पाडण्यात अाली अाहे,’ असेही आठवले यांनी सांगितले.

आंबेडकर बंधूंना दादरच्या नव्या इमारतीत दुप्पट जागा द्यावी आणि हा वाद सामोपचाराने मिटवावा. शेवटी वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजाच्या हिताचे येथे केंद्र उभे राहणार आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. तो देता नव्या इमारतीच्या बांधकामात आडकाठी आणणे दुर्दैवी असल्याचे आठवले म्हणाले. आंबेडकरी जनतेने आंबेडकर भवनप्रकरणी नेमकी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. हा विषय भावनिक करू नये. गेली साठ वर्षे या भूखंडावर काहीही होऊ शकलेले नाही. समाजाचे जाणते लोक आता येथे १७ मजली नवी इमारत बांधू पाहत आहेत. त्यामुळे नवी इमारत आंबेडकरी चळवळीचे मध्यवर्ती केंद्र होईल. त्याचे आपण स्वागत करायला पाहिजे, असे अावाहनही आठवले यांनी केले आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावर मंगळवारी मुंबईत पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागून ताेडफाेड झाली हाेती.
बातम्या आणखी आहेत...