आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारमध्ये मीच मंत्री, विधानसभेसाठी करार करणार - रामदास आठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल आणि त्यात मी मंत्री असेन’, असे भाकीत रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी वर्तवले. आगामी विधानसभेपूर्वी शिवसेना आणि भाजपकडून आपल्याला सत्तेतला किती वाटा देणार याबाबतचा लेखी करारच आपण करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी मी तीन जागा रिपाइंसाठी मागितल्या होत्या. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी दोन खासदार निवडून येणे गरजेचे होते. मात्र, ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत आल्याने मी दोन पावले मागे आलो; पण विधानसभेत मात्र आपण मागे येणार नाही. राज्यात सत्तेतला पंधरा टक्के वाटा रिपाइंला देण्याचे उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी कबूल केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर तसा लेखी करारच आपण करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

महायुतीचे 38 खासदार येतील
आघाडीबरोबर पंधरा ते अठरा वर्षे आपण राहिलो, पण आपल्या वाट्याची सत्तापदे त्यांनी दिली नसल्यामुळेच आम्ही त्यांची साथ सोडली. महायुतीतून बाहेर पडण्याचा आपला कोणताही विचार नसून पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचे आपले ध्येय असेल, असे आठवले म्हणाले. राज्यात महायुतीचे 48 पैकी 33 ते 38 खासदार निवडून येतील, असा दावाही आठवले यांनी केला.

सातार्‍यात विजय आमचाच होणार
खरे तर सातार्‍यासाठी उदयनराजे मला सहा महिन्यांपूर्वी भेटले होते; पण आमच्याकडून त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवताच शरद पवारांनी हुशारीने त्यांना उमेदवारी दिली. पण आम्ही सातार्‍यात पूर्ण तयारीने उतरणार आहोत. शिवसेनेची दोन ते अडीच लाख मते मिळतीलच, त्याचबरोबर आमच्या आणि इतर मित्र पक्षांच्या मतांच्या जोरावर ही जागा आम्ही निवडून आणू, असा आशावादही आठवलेंनी व्यक्त केला.

राज्यातही हवी तीन मंत्रिपदे
विधानसभा निवडणुकीत आपल्याला पस्तीस जागा हव्या असून त्यापैकी किमान पंधरा जागांवर आमचे लोक निवडून येतील, असा दावा आठवलेंनी केला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास किमान सहा मंत्रिपदे आमच्या वाट्याला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप प्रत्येकी दोन जागा आपल्याला देणार असल्याचेही आठवले म्हणाले.

कॉँग्रेसवाल्यांनो, लागू नका माझ्या नादी..!
व्यासपीठावर एखादी शीघ्र कविता सादर करण्याच्या आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आठवलेंनी या कार्यक्रमातही आपली कविता पेश केली.
लोकसभा निवडणुकीत पराभूत होणार आहे काँग्रेसची खादी,
केंद्रात सत्तेवर येणार आहेत नरेंद्र मोदी,
मी मात्र आहे आंबेडकरवादी,
काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही लागू नका माझ्या नादी.!