आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्या; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंचा टोला; राहुल गांधींनाही केले टार्गेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात सुरु असलेल्या मराठी आणि अमराठी मुद्द्यावरून भाजप आणि मनसे यांच्या सुरु असलेल्या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. मनसेला हॉकर्स भूषण पुरस्कार द्यायला हवा, असा टोलाही आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

 

मुंबईला वाढवण्यात मराठी माणसाचा वाटा आहेच, पण त्याचवेळी परप्रांतातून आलेल्या लोकांचे मुंबई वाढवण्यातही योगदानही महत्त्वाचे आहे, असे आठवले म्हणाले. आंबिवलीत (कल्याण) आज (शुक्रवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन झाले. त्याचे उद्घाटक म्हणून आठवले उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या शिवाय शिवसेनेचाही उत्तर भारतीय संघ आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जरा सामंजस्याने घ्यावे, असा सल्ला आठवलेंनी यावेळी दिला.

 

राहुल गांधींवर साधला निशाणा
राहुल गांधी मंदिरात जातात, त्यात काही चुक नाही. परंतु त्यांना आता भाजप जातीयवादी असल्याची टीका करण्याचा अधिकार राहिला नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचेच  कमळ फुलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला असे वक्तव्य केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांना ‘भय्याभूषण’ पुरस्कार द्यावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडले होते.

बातम्या आणखी आहेत...